Monday, July 31, 2017
नोटबंदी
नोटबंदीचा निर्णय विचारी - अविचारी, फायद्याचा - तोट्याचा, योग्य - अयोग्य वगैरे सर्व येत्या महिन्याभरात अजून स्पष्टपणे कळेल. आम्ही अर्थतज्ञ नसलो तरी आशावादी आहोत. आजची दिसत असलेली परिस्थिती ट्रान्झिशन फेजचा एक भाग आहे (असावा) असं मनोमन वाटतंय.
पण एका बाजूला गरजेच्या हजार दोन हजार रुपड्यांसाठी जनता ताटकळत असताना दुसरीकडे लाखो करोडोचं नवं चलन जप्त होतंय हे पाहिलं कि उद्विग्न व्हायला होतंय.
एका गोष्टीचं मात्र आश्चर्य वाटतंय कि ज्या बँकिंग चॅनेलच्या भरवशावर व्यवस्था परिवर्तनाचा घाट घातलाय, तो सामान्य जनतेशी द्रोह करून आपल्या तुंबड्या भरण्यासाठी पुन्हा पुंजीपतींची साथ देतोय आणि तथाकथित, नवोदित अर्थतज्ञ त्यावर काही न बोलता सरकारच्या नावाने खडे फोडण्यात धन्यता मानतायत. इथं माझ्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणजे संबंधित विभागाकडून जोरात कारवाई सुद्धा होत आहे. (पुन्हा हा फार्स ठरू नये ही अपेक्षा)
जिल्हा सहकारी बँकांना पैसे न पुरवल्याने शेतकरी आणि इतर ग्रामीण जनता त्रस्त आहेच हे नाकारता येणार नाही. पण खरंच हा पैसा त्या बँकांना पुरवला असता तर आता जेवढी रक्कम शेतकऱ्यांना मिळतेय तेवढीही मिळू शकली नसती. कारण ज्या शेतकऱ्यांचा कैवार घेऊन "सहकार" फोफावलाय त्यातुन कोणाच्या तुंबड्या भरल्या गेल्यात हे गावातलं शेंबडं पोरं सुद्धा सांगू शकेल. ह्याच काळ्या तुंबड्या सफेद करण्यासाठी नवं चलन वापरलं नसतं हे कोणी मायचा लाल छातीठोकपणे सांगू शकेल काय? आजची चलन टंचाई भीषण होण्यामध्ये या घटकाचा सुद्धा मोठा हिस्सा आहे.
स्वातंत्र्याची चळवळ गांधीजी आणि इतर नेत्यांनी जनआंदोलन म्हणून राबवली आणि यशस्वी करून दाखवली. असा उल्लेख मोदींनी 'स्वच्छ भारत अभियान' लाँच करताना केल्याचं आठवतंय. मला वैयक्तिकपणे हे पटलंय. त्यामुळे कोणतीही सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपला खारीचा वाटा असावा असं मला वाटतं. त्याचाच भाग म्हणून माझ्या बरोबर काम करणाऱ्या चार अशा कामगारांना मी इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग स्वतः चालू करून दिलंय ज्यांनी दहा बारा हजारांचे स्मार्ट फोन फक्त गेम खेळणे आणि पायरेटेड मुव्ही डाऊनलोड करून पाहणे यासाठीच वापरला होता. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गरजू पर्यंत बँकिंग विषयीची माहिती पोहोचवण्याचा मी जाणीव पूर्वक प्रयत्न करतोय. त्यासाठी "भक्त" असण्याची गरज नाही.
सध्या एकमात्र बरं झालंय. आपल्या प्रत्येक पोस्ट आणि लेखामध्ये "भक्त" म्हणून समोरच्याला साद घातली की आपल्या सात पिढ्या पवित्र झाल्याचा फील काहींना येतोय. आपली उंची पाव इंचाने का होईना वाढल्यासारखं वाटतंय. लोकसभा प्रचारादरम्यान गर्दीत मुंड्या खाली घालुन सोनिया-मनमोहन यांच्यावर अर्वाच्य टिप्पण्या करणारे आता गर्दी कमी झाल्यावर साव असल्याचा आव आणून उपदेशाचे डोस पाजतायत.
असो!
शेवटी निष्पक्ष हा शब्द फक्त डिक्शनरीत उरलाय. यात मी सुद्धा नामानिराळा नाही. काही सन्माननीय अपवाद असतील तर त्यांना नमन!
"एकमेका साहाय्य करू, ..........."
हे अमलात आणायला काही हरकत आहे का?
शैलेंद्र दिंडे
१४/१२/२०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment