Sunday, July 24, 2016
शिरपा
वैशाखाच्या वणव्याने शिरपाची पाठ एकदम रापून गेली होती. दिवसभर शेतात राब राब राबूनही हातात पैका काही टिकत नव्हता. एकुलता एक पोरगा ग्रॅज्यूएट होऊन दोन वर्ष झाली तरी नोकरीशिवाय बसून होता. त्याला मदतीला घ्यावं तर गांव काय म्हणील याची चिंता. त्यामुळे तो एकटाच जमेल तसा संसाराचा गाढा ओढत होता.
संध्याकाळी डेरीचा भोंगा वाजला आणि शिरपाने कामातून मान वर काढली. म्हसरांच्या धारा काढायची वेळ झाली होती. शिरपाने लगबगीने अवजारं आवरली आणि घराकडं चालू पडला. घरात पोहोचताच अवजारं कोनाड्यात उभी केली आणि गोठ्याकडे वळला. खुराक पाण्याची व्यवस्था केली आणि म्हसरांची धार काढायला बसला.
शिरपाचा पोरगा बाजूलाच घराच्या वळचणीला गल्लीतल्या सोम्या-गोम्याला घेऊन गंप्पा मारत बसला होता. शिरपा धार काढून बाहेर आला आणि तेवढ्यात त्याचा सावकार रत्ना शेठ त्याच्या एका सांडाबरोबर दत्त म्हणून त्याच्यासमोर उभा ठाकला. शिरपा जागेवरच थबकला. आता पुढच्या प्रसंगाची त्याला पुरेपूर कल्पना आली होती, नव्हे त्याला आता त्याची सवयच झाली होती.
"नमस्कार मालक," शिरपा जमेल तितका अदबीने रत्ना शेठला म्हणाला.
"काय शिरप्या, लेका कर्ज घेताना पार गुडघा टेकून गयावया करत हुतास. सहा महिन्यात फेडतु म्हणून पैसं घिऊन गेलायस, दीड वरीस झालं तरी ना व्याजाचा पत्ता हाय ना मुदलाचा. आज इथं पैसं टाक. न्हायतर मी म्हशीला दावं लावणार . काय करतुयास बोल?"
बाजूला बसलेला शिरपाचा पोरगा हे सगळं संभाषण ऐकत होता. पण त्याच्याकडे मध्ये पडून बोलण्यासारखं काहीच नव्हतं. शिरपा मात्र एकटाच किल्ला लढवत होता.
"मालक, यवड्यापावटी दया करा. ऊसाचा पयला हप्ता आला की तुमचं पैक चुकतं करायचं ठरिवल व्हतं. पण सोसायटीनं परस्पर खतं आणि बेण्याच पैस वळतं करून घेतलं. आता दुसरा हप्ता आला की तुमची पै न पै चुकती करतु मालक." शिरपा विनवण्या करत होता.
"बरं, तवर आमी काय खायचं? ते काय बी जमणार न्हाय. दोन दिवसात पैसं न्हाय आलं तर म्हसरं माझ्या दावणीला बांधलीच म्हणून समज." रत्ना शेठनं गुरगुरतच आपल्या बुलेटला किक मारली. जमलेल्या गावकऱ्यांच्या नजरा चुकवत शिरपा नाईलाजाने घराच्या चौकटीकडं वळला. तेवढ्यात रत्ना शेठनं गाडी थांबवत पुन्हा शिरपाला हाक मारली. शिरपाने दुधाच्या किटल्या चौकटीत उभ्या कारभारनीकडे सोपवून तिला घरात जायला सांगितलं आणि पुन्हा तो रत्ना शेठच्या जवळ गेला.
"मी काय म्हणतूय शिरप्या, तुज्या दोन पिढीच्यानं काय माझं कर्ज फिटल असं वाटत न्हाय. तू एक काम कर. विम्याची एकांदी पॉलीशी काड आणि दे जीव. माझ कर्ज बी फिटल आणि मागच्या माणसासनी दोन पैकं बी मिळत्याल." छद्मीपणे हसत रत्ना शेठने बुलेटची मूठ पिळली आणि निघून गेला. बुलेटनं उडवलेल्या धुरळ्यात रत्ना शेठ दिसेनासा होईपर्यंत शिरपा एकटक पहातच राहिला. त्याची कारभारीन तिकडं कोंबड्या खुराड्यात डाळत होती. त्या कोंबड्यांच्या कलकलाटाने तो भानावर आला. जड पावलांनी तो घरात आला आणि भिंतीला पाठ टेकून चौड्यावर तसाच बराच वेळ बसून राहिला. कारभारणीने खोदून खोदून विचारलं, पण गडी काहीच बोलायला तयार नव्हता.
बायको आणि लेकाबरोबरच रात्री थोडी भाजी भाकरी त्यानं पोटात ढकलली आणि जनावरांना वैरण टाकण्यासाठी गोठ्यात गेला. पाणी पाजून आणि वैरण टाकून झाल्यावर सुद्धा तो बराच वेळ कंदिलाच्या प्रकाशात आपलं पशुधन न्याहाळत राहिला. बघता बघता त्याच्या डोळ्यातून आसवांची धार सुरू झाली होती. कंदिलाच्या भोवती पिंगा घालणाऱ्या चिलटांसारखे अनेक भद्र - अभद्र विचार त्याच्या डोक्यात पिंगा घालत होते. थोड्या वेळाने त्याने काहीतरी मनाशी ठरवलं, फाटक्या टॉवेलने डोळे पुसले आणि गोठ्याचं तडकं बंद करून तो बाहेर आला. घरात येऊन बाहेरच्या सोप्यातच वळकटी टाकली आणि झोपी गेला.
पहाटे नेहमीप्रमाणे तो उठला, चूळ भरली आणि घोटभर चहा नरड्याखाली सरकवला. तांबडं फुटताच जनावरांची व्यवस्था लावून त्यानं कोनाड्यातली अवजारं खांद्यावर घेतली आणि शेताकडे चालू लागला. आज काही केल्या त्याचं कामात मन लागत नव्हतं. रात्री त्याने जे काम मनात ठरवलं होतं, त्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहणं त्याच्या जीवावर आलं होतं.
सकाळी आठाच्या सुमारास त्यानं नाईलाजाने आपली अवजारं बाजूच्या ऊसाच्या वावरात मधल्या सरीत नेऊन ठेवली आणि तो गावाबाहेरच्या टेकडीवर असलेल्या रत्ना शेठच्या बंगल्याकडे चालायला लागला. तो बंगल्यावर पोहोचला तेव्हा रत्ना शेठ अंगणातच चौपायीवर उघडाबंब बसला होता. त्याचा पाळीव सांड त्याच्या अंगाला तेल चोपडून मालिश करत होता. गेटजवळ पोहोचताच शिरपाने शेठला वाकून नमस्कार घातला आणि तडक त्याच्याजवळ जाऊन थांबला.
"काय शिरप्या, लेका पैसं बियस घिऊन आलास का काय? आं, एका रातीत लॉटरी लागली का काय तुला?" मावा खाऊन सडलेले दात वेंगाडत रत्ना शेठ म्हणाला.
"तसं काय न्हाय सरकार, गरिबाचं यवड कुठलं नशीब!" शिरपा उत्तरला.
"मग काय चा-पाण्याला आलायस सोयरा म्हणून?"
अपमानाचे कडू घोट गिळत शिरपाने येण्याचं कारण सांगितलं, "शेठ, एक शेवटची नड काडा माझी. न्हाय म्हणू नका. फकस्त चार पाच हजाराची गरज हाय. सा म्हयन्यात न्हाय फेडलं तर माझं वरच वावर तुमचं."
शिरपाच्या नव्या मागणीने चढलेला रत्ना शेठचा पारा वरच्या वावराचं नाव काढताच झटक्यात खाली आला. शिरपाचं वरचं वावर म्हणजे लोण्याचा गोळा . . . आख्खा गाव ज्याच्यावर डोळा ठेवून होता, तो आयताच रत्ना शेठच्या हाताशी आला होता. क्षणाचाही विलंब न करता त्याने दिवाणजीला आदेश दिला, "दिवाणजी, तिथलं पाच हजार हेच्या तोंडावर मारा आणि कागद बनवा, एकदम मजबूत, जात कधी पलटी मारल तेचा भरोसा न्हाय."
दिवाणजींच्या मागंमागं शिरपा शेठच्या घरात घुसला आणि सगळं सोपस्कार पूर्ण करून पाच हजाराचं बंडल पैरणीचा आतल्या खिशात सरकवून सरळ बाहेर चालू पडला. शेठला पुन्हा नमस्कार घालायचं पण तो विसरला. शिरपाच्या या वागण्यामुळे रत्ना शेठ पण मनातल्या मनात म्हणाला, "काय करणारेय हे बेणं पाच हजाराचं आणि यवडी काय घाई झाल्या ह्याला?"
शिरपाने पाच हजार घेऊन तडक खालच्या आळीतल्या धन्या बंडगरचं घर गाठलं. धन्या बंडगर विमा एजंट होता. नुकतीच आवराआवर करून तो तालुक्याला जायला निघाला होता. कधी नव्हे तो शिरपाला दारात बघून तो आश्चर्यचकित झाला आणि थोडासा वैतागलाही. कारण शिरपाकडून काही धंदा मिळण्याची शक्यता तर नव्हतीच, वरून त्याची परिस्थिती माहित असल्याने उगा सकाळी सकाळी पैसे वगैरे मागून नाट लावेल ही भीतीही त्याच्या मनात होती.
गाडीला बॅग अडकवत त्याने शिरपाला विचारलं, " काय शिरपतराव, कसं काय येणं केलं? काय विमा बिमा उतरायचा हाय का काय?"
"व्हय धनाजीराव," शिरपा उत्तरला. त्याच्या या अनपेक्षित उत्तराने धनाजीराव तीनताड उडाला.
"काय सांगताय राव."
-खरंच, मला पॉलीशी काढायची हाय.
गाडीला अडकवलेली बॅग धनाजीने काढली आणि तिथंच घराच्या जोत्यावर आपलं दुकान मांडलं. कोष्टकं जुळवून आणि शिरपाची जुजबी चौकशी करून त्याने अर्ज भरला आणि लाखाची पॉलिसी काढली. हप्त्याचे पैसे घेतले आणि पॉलिसीचा कागद आठवड्याभरात देण्याची हमी देऊन दोघंही घराबाहेर पडले.
जन्माचं ओझं उतरल्याचा भास आता शिरपाला होऊ लागला होता. बऱ्याच गोष्टी आयुष्यात करायच्या राहून गेल्या होत्या. त्यातली एक म्हणजे एकुलत्या एक धाकट्या बहिणीचं आहेर - माहेर. सदासर्वदा दारिद्र्यात बुडालेला आपला भाऊ म्हणून तिनेही कधी कशाचा हट्ट धरला नव्हता. चैत्र जत्रेत बहिणीला काही बोलावता नाही आलं. म्हणून त्याने शुक्रवारी देवाला नारळ देण्याच्या निमित्ताने बहीण - भावजी आणि भाचे मंडळीला आग्रहाने आमंत्रण दिलं. भावाचा शब्द खाली पडू न देता बहीण आपल्या नवरा मुलांसह माहेरी हजर झाली. देवदेव करून झाले. दोन दिवस मुक्काम करून परतताना शिरपाने विम्याचा हप्ता भरून उरलेल्या पैशातून बहिणीला साडीचोळी, भाच्यांना कपडे आणि भावजीला टॉवेल टोपीचा आहेर केला.
बहिणीची पाठवणी केली आणि आता शिरपा पॉलिसीच्या कागदाची वाट पाहत राहिला. एकेक दिवस त्याला आता महिन्यासारखा वाटू लागला होता. आणि तो दिवस उजाडला. दोनेक दिवस उशिरा का असेना बुधवारी धन्या बंडगरने पॉलिसीचा कागद शिरपाच्या हातात आणून दिला. त्याच्या दृष्टीने जन्माचं ओझं खरंच हलकं झालेलं होतं.
आधीच ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी शिरपा शेतात जायला निघाला. जाताना त्याने न विसरता एक लांबलचक कासरा बरोबर घेतला. कारभारणीने कारण विचारलं तर म्हणाला बांधावरच्या माजलेल्या बाभळीची शिरी वाडसून आणायची हैत. तीनेही मान डोलावली आणि ती आपल्या कामात पुन्हा गुंतली. इकडं शिरपा शेतात आला. बाकीचं औजारं वावरात ठेवली आणि बाजूच्या पांदीला गेला. तिथं एक उंचपुरं जांभळीचं झाड त्याने अगोदरच हेरून ठेवलं होतं. निर्विकारपणे त्याने खांद्यावरचा कासरा काढला, फास बनवला आणि इकडं तिकडं कोणी नाही याची खात्री करून झाडावर चढला. झाडाच्या मध्यावर जाऊन त्याने कासरा फांदीला बांधला आणि फास गळ्यात अडकवून स्वतःला खाली झोकून दिलं. मिनिटाभरात खेळ खलास झाला. इकडे त्याची कारभारीन दुपारची न्याहारी घेऊन शेतात आली तर शिरपाचा काही पत्ता नाही. खूप शोधलं पण काही फायदा झाला नाही. तिच्या जीवाला रुखरुख लागून राहिली.
उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडं आलेली पाटलाची नातवंडं जांभळं काढायला त्या झाडावर चढणार एवढ्यात त्यांना कोणीतरी फांदीला लटकताना दिसलं. पोरांनी बोंबाबोंब केली आणि अख्खा गाव गावच्या पांदीत जमा झाला. पोलीस पाटलाने जवळच्या पोलीस चौकीत वरदी दिली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने प्रेत झाडावरून उतरवलं आणि पंचनामा वगैरे सोपस्कार पूर्ण केलं.
शिरपाला भडाग्नी दिल्यावर त्याचा पोरगा तिथंच चितेच्या बाजूला बसला असताना त्याला त्या दिवशी सावकाराने आपल्या बापाला दिलेला सल्ला आठवला. बापाने आपल्यासाठी केलेला त्याग पाहून त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा पुन्हा सुरू झाल्या. दोन चार दिवस त्याला अन्न गोड लागलं नाही. तिसऱ्या दिवशी माती लुटून झाल्यावर तो थोडा भानावर आला. व्यवहारी विचार करत त्याने बापाची जुनी थैली चाचपायला घेतली. अपेक्षेप्रमाणे त्यात पॉलिसीचा कागद सापडला. तो घेऊन त्याने गुपचूप विम्याच्या दाव्यासाठी अर्ज केला.
महिनाभराने त्याच्या नावाने एक रजिस्टर लखोटा आला. त्यात त्याच्या नावचा अवघ्या तीनेक हजाराचा चेक आणि एक पत्र होतं . त्या पत्रातल्या मजकुरात एक ओळ होती ....
"पॉलिसीच्या नियम व अटींनुसार पहिल्या वर्षात विमाधारक व्यक्तीने आत्महत्या केल्याने संपूर्ण विम्याची रक्कम न अदा करता फक्त भरलेल्या हप्त्याची रक्कम अदा करण्यात येत आहे."
बापाचं क्रियाकर्म उरकून लेकाने पुन्हा अवजारं खांद्यावर घेतली आणि शेताच्या दिशेने चालू लागला.
****************************************************
शैलेंद्र दिंडे
२४/०७/२०१६
Subscribe to:
Posts (Atom)