Monday, July 31, 2017

भाभी आणि शकील

कराडच्या एसजीएम कॉलेजला होतो. उशिरा ऍडमिशन झाल्याने कॉलेजचं हॉस्टेल मिळालं नव्हतं. म्हणून मग जवळच्याच नलावडे होस्टेलला कॉट बेसिस वर रहात होतो. सुरुवातीला होस्टेलच्याच तळमजल्यावर राहणाऱ्या एका कुटुंबाच्या मेस मध्ये जेवायला जायचो. गावी असताना कानातून धूर निघेपर्यंत तिखट खायची सवय असल्याने मला काही त्यांचं साजूक जेवण झेपत नव्हतं आणि दिवसातून चारदा हादडायची सवय असलेला (पण नाईलाजाने इथं दोनवेळच्या जेवणावर भागवणारा) 'खाद बोकडाची अन काय लाकडाची' असा मी त्यांना झेपत नव्हतो. नतिजा दुसऱ्याच महिन्यात त्या मावशींनी पहिल्यादा मला हाकलला आणि तिसऱ्याच महिन्यात मेसला टाळं लावलं. अब जाये तो जाये कहा? असा विचार करत असतानाच विद्यानगर रोडवरच्या आणि आमचं हॉस्टेल व कॉलेजच्या मध्यावर असणाऱ्या 'शकील'च्या मेसचा पत्ता कोणीतरी दिला. सुरुवातीला नाक मुरडूनच तिथं गेलो. स्वछता आणि टापटीप फार नसायची. पण तीन गोष्टींसाठी मी तिथं पुढची दोन वर्षे काढणं पसंद केलं. एक म्हणजे जेवता जेवता बघण्यासाठी तिथं एक कृष्णधवल टि.व्ही होता. दुसरं कारण म्हणजे तिथं कितीही खाल्लं तरी खाणाऱ्याकडे तिरक्या डोळ्याने पाहून दातओठ खायची पद्धत नव्हती. घामाने सदा डबडबलेली भाभी मातीच्या चुलीवर चपातीवर चपात्या थापत असायची आणि साधारण आमच्याच वयाचा तिचा शकील प्रेमाने आणि आग्रहाने आम्हाला वाढण्याचं काम करायचा. तिसरं आणि अतिमहत्वाचं कारण म्हणजे पैसे. महिना ३५० रुपये असणारी मेसची फी मी कधीही वेळेवर भरल्याचं स्मरत नाही. परंतु पैसे लेट झाले म्हणून भाभीने कधी आमची आबाळ केली नाही. भाभीच्या कोणत्यातरी सणादिवशी तिने एका मोठ्या ताटसदृश्य भांड्याभोवती मेसमधल्या आम्हा आठदहाजणांना बसवलं आणि बिर्याणी खाऊ घातली होती. सुरुवातीला सगळे एकत्र कसं जेवायचं म्हणून विचित्र वाटलं होतं. पण नंतर मज्जा आली ... अगदी गोपाळकाला केल्यासारखी. या गोष्टीला आता २०-२२ वर्ष होऊन गेलीत. पण भाभी आणि शकीलचे चेहरे आजही लख्ख आठवतायत. मध्यंतरी मुंबईला परतताना एकदा भेटायला जायचं म्हणून मुद्दाम विद्यानगर मार्गे गेलो होतो. पण अंधारात ती झोपडी काही सापडली नाही. पुन्हा केव्हातरी जाऊ असं म्हटलो खरं. पण अजूनही योग आलेला नाही. भाभी आणि शकील . . . दोघांनाही "ईद मुबारक" -- Shailendra Dinde 26/06/2017

No comments:

Post a Comment