Monday, July 31, 2017
अट्रोसिटी आणि मराठा मोर्चा
अजित दादा काही माझा आवडता नेता नव्हे. पण त्यांची (कधी कधी) खरं आणि स्पष्ट बोलण्याची पद्धत मला जाम आवडते. आता आरक्षणाचं गाजर कोणी आणि कशासाठी दाखवलं वगैरे सारखे अड़चणीचे प्रश्न आपण विचारायचे नसतात - फ़क्त समजुन घ्यायचे असतात.
अट्रोसिटीचा गैरवापर का - कोणी - कशासाठी केला - करायला लावला हा सुद्धा असाच एक प्रश्न. सध्याच्या चर्चेतून मराठा मोर्चामागे प्रमुख दोन कारणं दिसतायत. एक कोपर्डीची अमानवी घटना व त्यानिमित्ताने अट्रोसिटीचा गैरवापर आणि दुसरं म्हणजे आरक्षण.
सबंध देशातल्या महिलांवरील हल्ले आणि अत्याचाराच्या घटना फ़क्त आणि फ़क्त कायदेशीर मार्गाने आणि प्रसंगी संसदेच्या माध्यमातून कायद्यात आवश्यक बदल करून नियंत्रणात येऊ शकतील. हीच बाब अट्रोसिटीबाबत सुद्धा खरी आहे. मोर्चे काढून (कोणत्याही जाती समुहाने) दबाव निर्माण करून जे हाती लागेल त्याला न्याय म्हणता येईल का याचा विचार प्रत्येक सजग नागरिकाने करायला हवा.
आरक्षणाच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. घटनेच्या चौकटीच्या बाहेर जाउन केलेला कोणताही प्रयत्न सफल होणार नाही याची कल्पना तत्कालीन आणि सध्य राजकीय वर्गाला आहे. त्यामुळे फ़क्त मोर्चे थोपवण्यासाठी तात्कालिक पोपटपंची केली जाईल. यातून समाजाच्या हाती पुन्हा तंबोराच मिळेल. आज शांततामय मार्गाने चाललेले मूकमोर्चे उद्या सुनामीत बदलणार नाहीत याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.
बरं आरक्षण मिळालं तरी त्याने लगेच काही बदल होउन सगळ आबादी आबाद होईल असं नाही. आज प्रत्येक तिनामागे दोन कुटुंब शेती करत आहेत. त्यांच्या समस्यांवर जोपर्यंत कायमस्वरूपी तोडगा दिला जात नाही तोपर्यंत फार काही क्रांतिकारक घडेल असं वाटत नाही.
याचाच दूसरा भाग म्हणजे शिक्षणातील संधी. तमाम शेतकरी वर्गातली पोरं नादारीच्या जीवावर उच्च माध्यमिक पर्यंत पोहोचतात. पण पुढे लायकी असूनही उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचनींचा डोंगर उभा असतो. इथं मागास आणि खुल्या प्रवर्गाच्या शुल्कामध्ये जी अजब तफावत पहायला मिळते ती पुढे जाउन खुल्या प्रवर्गातील उमेदवाराच्या स्वप्नांची राखरांगोळी करण्याबरोबरच सामजिक दुहीचं कारण बनते. या गंभीर मुद्द्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे? किमान आमच्या मराठा समाजातील "शिक्षण सम्राट" दादा - भाऊ - काका यांना यावर तात्काळ इलाज करणं शक्य आहे. पण ते तसं करणार नाहित. कारण आमची गरज पाच वर्षातून एकदाच जाणवते - मतदानावेळी. मराठा मोर्चाच्या निमित्ताने ही पारंपरिक रसद तूटताना पाहून अगदी योग्य ठिकाणी मिरच्या लागलेल्या आहेत हे रोजच दिसतय.
कोणाला वाटतय की "ब्राह्मण" मुख्यमंत्र्याचा गेम करण्यासाठीची ही चाल आहे. तर कोण म्हणतो की ही दलित दमननीती आहे. अजुन बरेच गमतीदार आडाखे वाचायला मिळतायत. यात खरं खोटं काय ते माहीत नाही.
हो पण ही एकी आपल्या उद्धारासाठी असेल तर एक मराठा म्हणून माझीही एक वीट मी लावु इच्छितो. अन्यथा दुरून डोंगर साजिरे हेच बरं.
शैलेंद्र दिंडे
१७.०९.२०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment