Monday, July 31, 2017

व्यक्ती एक . . . चेहरे अनेक

असाच काहीसा अनुभव गेल्या काही दिवसात सोशल मीडियात आणि विशेषत: फ़ेबुवर येतोय. उच्च अभिरुची ते हीन जातीयवाद व्हाया अश्लीलता आणि प्रबोधन असे निरनिराळे अजेंडे राबवणाऱ्या अनेक ग्रुपवर काही लोक वेगवेगळे मुखवटे परिधान करून बेमालूमपणे वावरतात. बाकी स्त्री-दक्षिण्याचे कैवारी आणि प्रत्येक बाईचा हटकून ताई, दीदी वगैरे उल्लेख करणारे पुरुष आणि इनबॉक्स गप्पांच वावडं असणाऱ्या (किंवा किमान तसं दाखवणाऱ्या) काही स्त्रिया एखाद्या अश्लील (मला अश्लीलतेच वावड नाही) आणि अभिरुचीहीन पोस्टवर ज्या प्रकारच्या कमेंट करतात ते पाहिलं कि क्षणभर माझा स्वत:च्या डोळ्यावरचा विश्वास उडून जातो. अर्थात, कोणाची काय आवड निवड असावी किंवा कोणी कुठे काय लिहाव - लायकाव हा ज्याचा त्याचा प्रश्न, फक्त त्यांनी साळसूद आणि सज्जनपणाचा आव आणून कांगावा करू नये एवढीच अपेक्षा - सक्ती नाही. *** परत एकदा तळटीप: *** मला अश्लीलता वगैरे वर्ज्य नाही. मी पण थोडा "गिरीश बापट" आहे. पण केजरीवाल नाही. 12/01/2016

उनाड बालपण

सहल घेउन जाणे आणि ती ही हायस्कूलची म्हणजे एक दिव्यच. त्यात कार्टी गावातली असतील तर मास्तरांच काय खर नसतय. पोरांची निघते ती सहल आणि मास्तरांची निघते ती धिंड अशी अवस्था. आयुष्यभर डाम्बुन ठेवलेली जनावरं कासरा ढीला सोडल्यावर उधळतात आणि मग गुराख्याची जी तर्हा होते तीच काहीशी मास्तर लोकांची व्ह्ययची. महाबलेश्वरच्या आर्थर सिट की कोणत्यातरी पॉइंटपाशी आमची वरात थांबली होती. सगळी पोरं पोरी रेलिंगवर वाकून वाकून दरीची खोली मोजत होती. काहीजन जुने पाच दहा पैसे दरीत टाकुन वर यायची वाट पहात होते. दुसरीकडे आमचा सहा सात अतिशशहान्यांचा कळप एकमेव क्यामेर्यातून भन्नाट पोझ देऊन फोटो काढण्यात व्यस्त होता. माझा नंबर शेवटी लागला. मास्तरांची नजर चुकवून मी दरीकाठच्या एका झाडावर चढलो. उडी मारताना फोटो क्लिक करायचा असा प्लान होता. तेवढ्यात माझ्या प्रिय दुश्मनाने गणिता च्या जाधव मास्तरच्या कानात गुदगुल्या केल्या, "सर तिकड बघा. तुमचा लाडका विद्यार्थी कुठ चढलाय." झालं, सकाळपासून मेंढ़र हाकून वैतागलेल्या सरांनी मग माझ्यावर शाब्दिक हल्ला चढवला, (आवडता इध्यार्थी असल्यामुळे जराशी सुट) "गापट्या हिकड़ नको तिकड दरीत उडी मार. तुझ्यामागुन मी पण येतो. मंजी तू पण सुटशिल आणि मी बी" उर्वरित सहल मात्र मी जाधव सरा पासून बचावासाठी वाया घालवली. 13/01/2016

बादरे साहेब

बादरे साहेब . . . साधारणपणे मी तिसरीत असेन. आमच्या कोकरूड पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक म्हणून बादरे साहेब रुजू झाले होते. त्याचं मूळ गाव कुठेतरी सांगोल्याच्या जवळपास होत. ते महिना ३० रुपये भाड्याने आमच्या घरी रहात होते. आमच घर एकदम रस्त्यालगत. दिसायला तसं खूप मोठ्ठ आणि राजेशाही. पण म्हणतात ना "बडा घर आणि पोकळ वासे" अशीच काहीशी अवस्था होती. माझे आजोबा ठाणे बेलापूर रोडच्या तत्कालीन "Standard Alkali" कंपनीतले मोठे लेबर कंत्राटदार. त्यांनी मुंबई सोडली आणि सगळ चित्र बदलल. माझ्या वडिलांनी नोकरी न करण्याच्या हट्टापाई बरेच धंदे केले आणि खड्ड्यात घातले. ते खड्डे भरता भरता आजोबांची उरली सुरली कमाई तर संपलीच, वरून शेतीही गहाण पडली. त्यामुळे स्वत:ची उरली सुरली जमीन कसता कसता आणि अल्प उत्पन्न असल्यामुळे इतरत्र मोल मजुरी करण्याची वेळ आई-वडिलांवर आली. अर्थात वडिलांची यशस्वी (?) वाटचाल पाहता घराच सर्व व्यवस्थापन आपसूकच आईकडे हस्तांतरित झाल होत. अशा परिस्थितीत मला पैशाच दर्शन होणं दुर्लभच. एकवेळ शाळेत एकाकडे मी कॅमेल ची कंपास पेटी पहिली आणि ती माझ्या पक्की डोक्यात घुसली. पण ती घेण्यासाठी घरातून पैसे मिळवण अशक्य होत. दरम्यान माझी आई खर्चातून उरलेले पैसे एखाद्या कडधान्याच्या वगैरे डब्यात ठेवताना मी बर्याचदा पाहिलेलं होत. असंच एकदा महिन्याच्या सुरुवातीला आमचे भाडेकरू बादरे साहेबांनी घरभाड्याचे ३० रुपये सकाळी सकाळी आईकडे दिले. तिने ते सवईने एका डब्यात ठेवले. मी चहा पीत पीत कान्या डोळ्याने ते बघितलं आणि प्लान मनात पक्का केला. शनिवारी सकाळची शाळा असायची. मी ११ वाजता घरी आलो. आईवडील आणि आजोबा शेतात गेले होते. संधी साधून मी ते पैसे उडवले आणि तडक गावातल्या स्टेशनरीत गेलो. माझ्यासाठी माझ्या स्वप्नातली कंपास पेटी आणि लहान भावासाठी कायबाय वस्तू खरेदी करून घरी आलो. भावासाठी आणलेल्या वस्तू त्याला देऊन टाकल्या आणि निवांत झालो. शेवटी जे व्हायचं तेच झाल. संध्याकाळच्या वेळी आईवडील शेतातून परतताच भावाने त्याला दिलेल्या वस्तू नाचवतच त्याचं स्वागत केल. वस्तू कोणी दिल्या, कुठून आणल्या विचारताच त्याने माझ्याकडे बोट दाखवलं. आता माझ काही खर नाही हे कळून चुकल होत. माझ्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु होता. सर्व अस्त्र वापरून झाली पण मी काही दाद देत नव्हतो. आईचे मात्र रडून रडून डोळे सुजले होते. आख्खी रात्र तिने जागूनच काढली. सकाळी नेहमीप्रमाणे बादरे साहेब चहासाठी आले. तेव्हा त्यांना माझा पराक्रम समजला. मला झोपेतून उठवून त्यांच्या कोर्टात उभ करण्यात आल. पोलिसी खाक्या दाखवताच मी पोपटासारखा कबुल झालो. तेव्हा त्यांनी माझी नेमकी कशी "शाळा" घेतली ते इथ लिहिणं शक्य नाही. पण एक मात्र झाल, माझ्या आयुष्यातली ती बहुदा पहिली आणि शेवटची चोरी ठरली. कदाचित तेव्हा माझी "शाळा" घेतली गेली नसती तर मी हा लेख लिहिण्याऐवजी आज एखाद्या पेपरात माझ्या अशाच एखाद्या पराक्रमाची कथा तुम्हाला वाचावी लागली असती. असो. दोनेक वर्षांनी बादरे साहेबांची बदली झाली आणि पुन्हा माझी त्यांची कधीही भेट झाली नाही. भेटायची खूप इच्छा होती. पण एकदिवस अचानक त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजली. एकांतात धाय मोकलून रडलो . एखादा रक्ताचा नातेवाईक गेल्यासारखी भावना आजही माझ्या मनात आहे. @शैलेंद्र दिंडे #मी_असा_घडलो 25/01/2016

आंदोलनाचे हिशेब

शनि शिंगणापूर खेळखंडोबावरून सहज आठवल म्हणून . . . ================================================= मी डिप्लोमाच्या दुसर्या वर्षात शिकत होतो. वर्गात १२ वी नंतर डिप्लोमाला प्रवेश घेतलेले आम्ही १२ ते १५ जन होतो. त्यात नेहमीच प्रत्येक गोष्टीत लीड करणारा माझा एक मित्र होता. दुसर्या वर्षाला असताना कॉलेजने कशाचीतरी फी अचानक वाढवली - नेमक आठवत नाही. झालं, आमच्या नेत्याने तडक कॉमन ऑफ ची हाक दिली. एखाद दुसरा अपवाद वगळता वर्ग ओस पडला. प्राचार्यांना हि बातमी समजताच त्यांनी आमच्या नेत्यास आपल्या कार्यालयात पाचारण केलं. कॉमन ऑफचं कारण विचारताच त्याने फी वाढीचा मुद्दा मांडला. आमचे प्राचार्य करारी असले तरी अतिशय समंजस होते. ते म्हटले, "फी वाढली वगैरे ठीक आहे, त्यासाठी आंदोलन पण ठीक आहे. पण त्यासाठी काहीतरी पद्धत असते याची तुम्हाला कल्पना आहे का?" त्याने नकारार्थी मान डोलावली. त्याला समजावत सर म्हणाले, " अरे यासाठी पहिल्यांदा सबंधित व्यक्ती किंवा खात्याबरोबर पत्रव्यवहार करावा, भेट घेऊन मुद्दे मांडावे आणि दाद न मिळाल्यास मग आंदोलन करावे." आपली चूक मित्राच्या लक्षात आली. तसं त्याने कबुल केल आणि निरोप घेतला. तो प्रश्न अर्थातच सुटला नाही कारण ती शासकीय संस्था असल्याने त्यात कॉलेजचा काहीही संबंध नव्हता. असो. =============================================== आता मुळ मुद्दा … शनी मंदिरातील स्त्री प्रवेशाचा जो मुद्दा आहे त्यासाठी गाजावाजा न करता न्यायालयीन लढाईचा मार्ग उपलब्ध नाही, का उठसुठ बाबासाहेबांचा वापर करणार्या पुरोगाम्यांचा कायद्यावर आणि न्यायपालीकेवर विश्वास नाही? पूर्वी गावाकडे आणि काही ठिकाणी आजही स्त्रिया हनुमानाच्या मंदिरात जात नाहीत. शहरात मात्र बर्याच ठिकाणी स्त्रिया आत जाऊन पूजा करतात. खरोखर इथे जर मुद्दा स्त्रियांना कमी लेखण्याचा असता तर याठिकाणी सुद्धा विरोध केला गेला असता. अशा परंपरा त्यावेळी का सुरु केल्या गेल्या हे आपल्याला नेमक माहित नाही. पण यानिमित्ताने चर्चा घडवून किंवा संविधानिक मार्गाने सुद्धा समस्या सोडवता आली असती. पण अस केल तर पैसा आणि रातोरात प्रसिद्धी मिळत नाही. आपल्या विचाराशी भिन्न असणाऱ्या सरकारविरोधातील हिशेबही चुकते होत नाहीत हे मूळ कारण आहे. उद्या असा प्रवेश दिला गेला (आणि तो द्यावा) तरी खरोखरच जादूची कांडी फिरून सर्वत्र स्त्री-पुरुष समानता येईल किंवा स्त्रियांचा सन्मान होईल अस मानणारे मूर्खांच्या नंदनवनात बागडतायत एवढंच म्हणता येईल. तूर्तास पुरे. @शैलेंद्र दिंडे 27/01/2016

एक धडा असाही ...

धडा असाही ... २००२ च्या सुमारास मी माझ्या काही मित्रांसोबत डिलाइल रोड भागात पंचगंगा सोसायटीत रहायचो. ऑफिस दिंडोशी - मालाडला होतं. रोज सकाळी लोअर परेल वरुन 7:05 च्या लोकलने दादर आणि तिथुन ७:२१ ची गोरेगाव फ़ास्ट, पुढे स्टेशन ते दिंडोशी बसने प्रवास असा रोजचा दिनक्रम असायचा. एकेदिवशी नेहमीप्रमाणे गोरेगाव पूर्वेला ३४३ मधे बसलो. बस सुटायला पाचेक मिनिट वेळ होता. कंडक्टरने तिकिटं फाड़ायला सुरुवात केली. मी पैसे काढण्यासाठी खिशात हात घातला तर सुट्टे ३/- तर नव्हतेच पण त्यादिवशी मी पाकिट पण घरी विसरून आलो होतो. बस सुटायच्या आत पटकन खाली उतरलो. खरतर माझ्याच ऑफिस ला जाणारे अजूनही काहीजन बसमध्ये होते. त्यांच्याकडून पैसे उसने घेउन मी बसने जाऊ शकलो असतो. पण मी ठरवलं की थोडी शिक्षा / प्रयाश्च्तित्त घेतल्याशिवाय सुधारणा होणार नाही. कारण असं होण्याची ही दूसरी वेळ होती. मी तड़क आरे रोड पकडला आणि घामाघुम होत साडे नऊला दिंडोशी ऑफिसला पोहोचलो. घरी परतल्यावर दरवाज्याजवळच्या स्विचबोर्डवर एक फलक चिकटवुन टाकला ... "आपण काही विसरला तर नाहीत ना?" अशी फजीती त्यानंतर आजपर्यंत कधीही झाली नाही. #कुबेर_हम_भी_है_जोश_में @शैलेंद्र दिंडे 10/02/2016

"ती"

"ती" अल्लड, अवखळ, अगदी नदीसारखी प्रेमात पडायचं वय होत कि नव्हत कल्पना नाही . . . पण पडली, अगदी अलगद. तशी त्यालाही ती मनापासून आवडायची. तिच्या एकाच झलकसाठी तासंतास तो बसून राहायचा नाक्यावर. बाकी काही अपेक्षा नव्हती तिच्याकडून. आणि अचानक एके दिवशी कबुतर आलं तिची चिठ्ठी घेऊन. क्षणभरासाठी आकाश ठेंगण वाटल त्याला. "चला आपलीही नाव किनार्याला लागली" म्हणून खुश झाला. फोटो, चिठ्ठ्यांची देवाणघेवाण सुरु झाली रोजच. थोडी हटकेच होती त्यांची कहाणी - फक्त पवित्र प्रेमाने ओथंबलेली. प्रत्यक्ष न भेटताही उत्तरोत्तर फ़ुलत जाणारी. कारण एका मुद्द्यावर मात्र दोघांचं एकमत होत. शिक्षण - नोकरीचं होईपर्यंत आळीमिळी गुपचिळी. नियतीला मात्र हे एवढ सपक प्रकरण मान्य नव्हत. मग काय? कहाणी में ट्विस्ट! एकदाच तिच्या घरी कळाल आणि "अवकाळी" लग्नासाठी तिच्यामागे तगादा सुरु झाला. तिचा धीर सुटू लागला. "थोडे दिवस सहन कर" हा एकच सल्ला तो देऊ शकत होता. चारच महिन्यात तो कामधंद्याला लागला. लवकरच तिच्या बापाला भेटू म्हणून आखणी करू लागला. सोनेरी आयुष्याची स्वप्ने रंगवू लागला. पुढच्याच संध्याकाळी परत एका चिठ्ठीने भूकंप केला. "माफ कर, . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . " तो पुरता कोलमडला. पण शेवटच्या वाक्याने पुन्हा उभा राहिला. "मी तुझीच आहे जोपर्यंत तुझ्या चेहऱ्यावर ते लाख मोलाचं स्मित आहे." . @शैलेंद्र दिंडे. 12/02/2016

मनुस्मृती नावाचं थोतांड

मनुस्मृतीच पुनरुज्जीवन करण्यासाठी हातभार लावल्याबद्दल फुरोगामी कंपू आणि B-gay-D वळवळीचे आभार! आमच्या आज्ज्या - पणज्याने पण कधी ती वाचली नव्हती. आमच्यासारख्या सामान्य हिंदूंच अर्ध आयुष्य जगण्याची जद्दोजहद करण्यात आणि पुढच्या पिढीचं भलं व्हावं म्हणून मुख्य प्रवाहातील शिक्षण देण्यात खर्ची पडत असताना कोण कशाला नस्ती उठाठेव करेल? पण उठसुठ मनुस्म्रुतिचा उल्लेख करण्याने बर्याचदा भावना चाळवल्या जायच्या आणि नेहमी वाटायचं की हे लोक एवढे राळ उठवतायत तर एकदा वाचूनच पहावी. आता संधी मिळतेय तर फायदा घ्यायलाच हवा - दूध का दूध एकदा व्हायलाच हवं. अर्थात आजच्या घडीला कोणताही हिंदु मनुस्मृतीचा संदर्भ घेउन जगत नाही किंवा त्याप्रमाणे कोणालाही वागणूक देत नाही आणि मनुस्मृती नव्याने प्रकाशित झाली तरी पुढे तिचा संदर्भ घेउन वागणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. देश प्रजासत्ताक होउन दशकं उलटलीत. संधी, सोई - सवलतींचा पाउस पडला तरीही आपल्या कर्मदरिद्रीपणाचं खापर फोड़ण्यासाठी मनुस्मृतीसारख्या काल्पनिक शत्रुची गरज का भासावी यांवर चिंतन करण्याची तसदी संबंधित घेतील काय? @शैलेंद्र दिंडे १०/०३/२०१६

रचनात्मक टीका

जवळपास ९ वर्षे नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात होतो. तिथं मी काय हरवलं यापेक्षा तिथून मी काय मिळवलं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. ९ वर्षात हजारो माणसांशी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संबंध आला. या क्षेत्रात जसजसे तुम्ही वरच्या पायरीवर जाता तसतसे तुम्ही काय आणि कसे विकु शकता यापेक्षा तुम्ही माणसांशी कसे वागता, त्यांना कशाप्रकारे वागवता याला खुप महत्त्व दिले जाते. हे काम सोप्प व्हावं म्हणुन विविध प्रशिक्षण कार्यक्रमातुन जावं लागतं. यातलाच एक धडा म्हणजे एखाद्याची चुक त्याला लक्षात आणुन द्यायची असेल तर कमीत कमी नुकसान करून हे काम पार पाडण्याची कला. माणुस छोटा असो की मोठा - प्रत्येकाला आत्मसन्मान असतो. चुक लक्षात आणुन देत असताना त्या आत्मसन्मानाला ठेच लागु न देणे हे आपलं प्रथम कर्तव्य असतं. अशी चुक लक्षात आणुन देण्यापुर्वी त्याने केलेल्या चांगल्या कामांची प्रथम खरीखुरी आणि मनापासून स्तुती करावी. एक नेता म्हणुन त्या व्यक्तिमधे असलेल्या इतर चांगल्या गुणांची प्रामाणिक दखल घ्यावी ज्यामुळे आपल्याला त्या व्यक्तिबद्दल खरच आदर आहे हे कळेल. त्यानंतर त्याच्याकडुन अनावधानाने घडलेल्या चुकिबद्दल कल्पना द्यावी. त्याला चुक सुधारण्याची संधी देण्याबरोबरच त्याच्यापाठी आपण ठामपणे उभे आहोत हा विश्वास निर्माण करणे जास्त महत्वाचे. जर एखाद्या व्यक्तीमधे असणार्या चांगल्या गुणांची आपण स्तुती करु शकत नसु तर त्याच्या चुकीच्या गोष्टीं विषयी बोलण्याचासुद्धा आपल्याला हक्क रहात नाही. ****************************************** काल मा. जावेद अख्तर साहेबांचं राज्यसभेतलं भाषण ऐकल्यावर मला हे मुद्दाम शेअर करावं वाटलं. आजकाल आपला राजकीय पट constructive criticism पासून कोसो दूर चाललेला असताना अख्तर साहेबांच भाषण म्हणजे एक आशेचा किरण मानायला हरकत नाही. @शैलेंद्र दिंडे १६/०३/२०१६

फकीर नाईक

आज माहितीच्या महाजालावर भटकता भटकता अपघाताने कोण्या झाकीर नाईक च्या विडीओशी टक्कर झाली. आपल्या आणि इतरांच्या धर्माबद्दल एवढी अगाध माहिती असलेला (किमान प्रथमदर्शनी तसं दाखवणारा) महाभाग मी पहिल्यांदाच पाहीला. हा रोज गीता, बायबल, कुराण, इ. चा काढा पीत असावा असा मला सतत भास होत होता. सभेमध्ये जमलेल्या इतर धर्मीय लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना / हरकतींना अगदी त्या त्या धर्मग्रंथातले दाखले देत हा मनुष्य (?) अशी काही उत्तरे देत होता की सामान्य प्रेक्षक अचंबित व्हावा. ह्याच्या डझनभर भाषणातील काही ठळक मुद्दे:- १. म्हणे मानवजातीच्या अस्तित्वाबरोबरच इस्लाम अस्तित्वात आला, त्यामुळे हाच खरा धर्म. २. एक नवीन जावईशॊध:- मूळ हिंदू धर्मात मूर्तीपूजा निषिद्ध आहे, त्यामुळे राम, कृष्ण वगैरे देव किंवा अवतारांना मानण, पूजा करणं म्हणजे धर्मद्रोह. ३. निष्पाप जीवांची हत्या इस्लाम ला मान्य नाहीं. (कमालच झाली आता) अजून बरंच काही आहे, पण मुलत: माझा बुध्यांक कमी असल्याने माझ्या लक्षात राहिले नाही म्हणा हवे तर. (तसंही संगणकाच्या जमान्यात मेंदूच गोडाऊन करण्याची मला गरज वाटत नाहीं) या सगळ्या भाषणांचा सारांश मात्र विचार करायला लावणारा आहे. १. एखाद्या विषयावर डिबेट करत असताना साधारणत: सबंधित लोकांनी पूर्वग्रह दुषित असू नये असा अलिखित का असेना नियम आहे. माझ्या मते एक विशिष्ट मत बनवून मग धर्माच्या उच्च-निचतेबद्दल चर्चा करणं म्हणजे गर्भलिंग निदान केल्यानंतर मुलगा कि मुलगी होणार यावर बेटिंग घेण्यासारख आहे. २. हिंदू धर्म परमेश्वर एकंच आहे, मात्र त्याच्याजवळ पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत अशी शिकवण देतो. दुसर्या बाजूला इतर धर्म आम्हीच मोठे, आमचंच खर म्हणून थांबत नाहीत. तर त्याहीपुढे जाऊन शिकवण न मानणार्याला मृत्युदंड देण्याची, प्रसंगी नरकात पाठवण्याची भाषा करतात. तरीही हिंदू सगळे धर्मांध आणि बाकी सगळे निधर्मी, सेकुलर कसे? हि सगळी भाषणं ऐकल्यावर एक गोष्ट निश्चितपणे मी सांगू शकतो कि ज्या धर्मामध्ये किंवा संप्रदायामध्ये असे झकमारे नाईक आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत, त्या धर्मातील लोक कधीही भारतासारख्या खंडप्राय देशाच्या मुख्य धारेमध्ये सामील होण्याची शक्यता नाही. मग कोणीही कितीही ********* आपटू देत. 15/04/2014

हाल्या

माझ्या आजोळी (माझ्या जन्माअगोदर) हाल्या नावाचा एक इसम होता. खांद्यावर कुर्हाड, अंगात मळकी पैरण, डोक्याला भगवं मुंडास आणि कमरेवर कळकट लंगोट हा त्याचा वेष. रोज सकाळ संध्याकाळ म्हसरं-गयरं माळाला चरायला - पाण्याला घेऊन जाणे हा त्याचा रोजचा उद्योग. बिळाशीचा ऐतिहासिक जंगल सत्याग्रह सुरु होता. महादेवाच्या मंदिराजवळ सभा सुरु होती. अचानक गोर्या सायबाच्या पलटनीने धाड मारली. सगळीकडे धरपकड़ सुरु झाली. मंदिराच्या बाजुनेच हाल्या नित्यनेमाप्रमाणे खांद्यावर कुर्हाड घेउन माळाला चालला होता. गोर्या सैनिकांनी क्रांतिकारक समजुन त्यालाही दोन चार धोपाट्या घातल्या आणि अटक केली. पुढे यथावकाश देश स्वतंत्र झाला. हाल्याला फारशी अक्कल नसली तरी त्याच्या मुलाला होती. त्याने बापाचं नाव स्वातंत्र्य सैनिक म्हणून नोंदवुन घेतलं. पेंशन सुरु झाली. वेगवेगळ्या सवलती ढापुन कुटुंब स्थिरस्थावर झालं. ही झाली हाल्याची कथा. आज हे नेमकं आठवण्याचं कारण म्हणजे मोदी सरकार. साधारणपणे दोन वर्षापूर्वी नरेंद्र दामोदरदास मोदी नावाच्या ब्रह्मराक्षसाने दगाफटका करून लोककल्याणकारी - लोकशाहीवादी - जनाधारप्राप्त कांग्रेस सरकार उलथवुन टाकुन आपली हुकुमशाही प्रस्थापित केली. जनतेच्या खाण्याच्या - पिण्याच्या - झोपण्याच्या - बोलण्याच्या - ओकण्याच्या स्वातंत्र्यावर बालंट आलं. समस्त समाजसेवकांची यामुळे झोपमोड़ झाली आहे. ही अन्यायी हुकुमशाही उलथवुन टाकण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून ते अहोरात्र झटत आहेत. स्वातंत्र्यसूर्य उगवल्यानंतर त्यांची दखल घेतली जाईलच. परंतु इतरांनीही या संधीचा लाभ घेउन आपल्या तलवारी - वस्तरे परजावेत आणि हल्लाबोल करावा. पुढच्या पिढ्यांची सोय करण्याची नामी संधी अजिबात दवडू नये. किमान हाल्यासारख क्रांतिकारकांच्या आजुबाजुला लुडबुड करणे अपेक्षित. क्रांतिकारक होण्यासाठी पात्रता :- १. शिक्षणाची अट नाही. २. हळदी कुंकू वेग्रे सारखे सामजिक उपक्रम राबवले असल्याचा पुरावा म्हणून ब्यानरचे फोटो आवश्यक. ३. कोणत्याही गोष्टीचा संबंध मोदीशी लावण्यात हातखंडा आवश्यक. ४. आडनाव चौधरी, केतकर, बाळ वगैरे असल्यास प्राधान्य. ५. जातीने ब्राह्मण नसल्यास फाउल समजण्यात येईल. ६. प्रत्यक्ष भेटीत बाकीच्या अटी सांगण्यात येतील. *** त्वरा करा. प्रथम येणार्या १०० पात्र क्रांतिकारकांना डबल पेंशनची विशेष ऑफर. (हाल्या हे काल्पनिक पात्र आहे.) 28/05/2016

अलिबाग से आयेला है क्या?

आलिबाग से आयेला है क्या? (No offense intended) जवळपास १८ वर्षापूर्वी मुंबईत आलो. ऑगस्ट १९९८ मध्ये बी. एस. ई. एस. मध्ये रुजू होताच पोस्टिंग मिळेपर्यंत आमच्या सर्व रिसिव्हिंग स्टेशन्स ला भेट द्यायला जोग साहेबांनी सांगितलं होतं. मुंबईत नविन असल्याने ट्रेनची काही विशेष माहिती नव्हती. मला बान्द्र्यावरून भायंदरला जायचं होतं. मी कमीत कमी गर्दी पाहून ३ नंबर प्लेटफार्मवर थांबलो होतो. पाचेक मिनिटात गाडी आली. गाडीतून उतरणारया एकाला मी विचारलं, "यह गाडी भायंदर जायेगी क्या?" अगदी तुच्छतेने माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकत तो बोलला, "आलिबाग से आयेला है क्या?" मला काही उमगलं नाही. "नहीं, कोकरुड से," मी (मनातल्या मनात) उत्तरलो. पुढच्या काही दिवसात हा वाक्यप्रयोग बर्याचदा माझ्या कानावर पडला आणि हळुहळु कोड उलगडत गेलं. हा आपल्या 'नेर्ले' सारखा प्रकार दिसतोय हे कळुन आलं. *** नेर्ले *** माझ्या गावाच्या दक्षिणेला वारणा नदीच्या पलिकडे कोल्हापूरच्या शाहुवाडी तालुक्यातलं गांव. प्राथमिक शिक्षणाच्या पुढे गावात व्यवस्था नसल्याने नेर्ल्यासहित आजुबाजुच्या गावातील मुलं पुढच्या शिक्षणासाठी आमच्या कोकरुडला यायची. त्यांना चिडवण्यासाठी आम्ही त्यांना "आडबाळ नेर्लेकर" अशी उपाधी लावत असु. या उपाधीमागे अनेक सुरस कथा आहेत, अर्थात खर्या की काल्पनिक ते देवालाच माहीत. कथा क्र.१ नेर्ल्यात कुण्या पाटलाने त्याकाळी एक नविन डिझेल इंजिन आणून नदीवर पाणी उपसण्यासाठी बसवलं होतं. व्यवस्थित फाउंडेशन न करताच ते बसवलं आणि चालु केलं. वाइब्रेशनमुळे ते लाल मातीत रुतायला लागलं आणि त्याची चाकं जमिनीवर टेकताच ते सगळ्या रानभर पळायला लागलं. मालकाला किंवा कोणालाही हे थांबवायचं कसं हे माहीत नसल्यामुळे सगळे गावकरी मिळुन ढेकळ मारून त्याला थांबवायचा प्रयत्न करत होते. अर्थात इंजिन थांबलं पण डिझेल संपल्यावर आणि बाजुच्या पिकांचा कुटाना झाल्यावर :) :) :) कथा क्र.२ एकदा नेर्लेकर आणि कोकरुडकर यांच्यात नदीच्या मळीत क्रिकेटची मैच चालु होती. नेर्लेकर फलंदाजाने एक बॉल थेट मक्याच्या शेतात टोलवला. कोकरुडकर क्षेत्ररक्षक तो शोधून आणेपर्यंत नेर्लेकर पठ्ठ्याने पळुन धावा काढून सेंचुरी ठोकली. :) :) :) :) :) या आणि अशा अनेक कथा आजही चगळल्या जातात, पण फ़क्त टाइमपास म्हणून, तुच्छता कधीच लोप पावलीय. कारण आडबाळ नेर्ले आता आड्बाळ राहिलेले नाही. पानीपतकार विश्वास पाटिल यांच्यासारखे थोर साहित्यिक याच नेर्ल्यातुन निर्माण झालेत. (अणि हो, च्यामारी एवढं पाल्हाळ लावलं पण एक सांगायचं विसरलो - आमचे पूर्वजही याच नेर्ल्याच्या दिंडेवाडीचे बर्का) 15/06/2016

मदारी आणि महाड

महाडची दुर्घटना होण्याच्या दोनच दिवस आधी इरफान खानचा "मदारी" पाहिला होता. आजच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळाला आणि जनता म्हणून सामान्य माणसालाही त्याच्या क्लायमॅक्स मध्ये उघडं पाडलेलं आहे. घटना कोणतीही असो; आमच्या प्रतिक्रियासुद्धा व्यक्ती, पक्ष, जात, धर्म पाहूनच बाहेर पडतात. एकमेकाविषयीचे हिशेब चुकते करण्यासाठी अशा घटना म्हणजे सुवर्णसंधीच जणू. पूर्वी विरोधात असणारे धडाकेबाज (!) नेते आता सत्तेत आहेत आणि जणू सत्तेसाठीच जन्म झाल्याच्या अविर्भावात असणारे विरोधात बसलेत. कालच्या त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा अगदी बोलक्या आणि अपेक्षित होत्या. धरणवीर दादासाहेब विधानसभेत म्हणाले कि संबंधित ब्रिटिश कंपनीने ५ वर्षाआधी सूचना देऊनही पूल वापरातून बाद का नाही केला? आता पाच वर्षांपूर्वी राज्य कोणाचं होत हे बहुतेक तावातावत बोलताना ते विसरले. कोणी जगताप नावाचे माजी आमदारसुद्धा घटना स्थळी हीच प्रतिक्रिया मीडियाला देत होते. मा. मु. मं. आणि संबंधित खात्याचे मंत्री म्हणतायत कि आम्ही सगळ्या ब्रिटिशकालीन पुलांच स्ट्रक्चरल ऑडिट करू. परंतु, गेल्या मे मध्ये केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हाच पूल वापरास योग्य घोषित केला गेलाय. त्याचं काय? आणि हा एकूणच प्रकार "वरातीमागून घोडं" असाच नाही का? असो. दुर्दैव हे कि एवढ्या मोठ्या दुर्घटनेतून सुद्धा आम्ही काहीच शिकणार नाही तेच अंतिम सत्य आहे. पंधरा - वीस दिवसांनंतर मृतांचे सर्व अंतिम संस्कार (प्रेत सापडलच तर) पूर्ण झालेले असतील. मीडियाला अधिक टीआरपीवाली एखादी घटना हाती लागलेली असेल आणि विविध चॅनेल चे अँकर ती आपल्यापर्यंत "सब से तेज" पोहोचवण्यासाठी अगदी ऑरगॅसम आल्यासारखे किंचाळत असतील. तुम्ही आम्ही टीव्ही समोर तंगड्या पसरून चहा-पोहे कांदाभजीचा आस्वाद घेता घेता त्या बातमीचा आनंद घेत असू. नेतेमंडळी त्या बातमीत गाय - बैल, पुतळा वगैरे शोधतील आणि आपल्याला धंद्याला लावण्यासाठी आपली बुद्धिमता पणाला लावतील. एकदा का आपण धंद्याला लागलो कि त्याच गदारोळात एखादा आदरणीय ब्लॅक लिस्टेड कंत्राटदार पन्नासेक पुलांची कंत्राट मिळवेल. ते पूर्णत्वाला जाण्याअगोदर टोलचं दुकान थाटेल. खळ्ळखट्याकवाल्यांचा रोजगार पुन्हा सुरु होईल. सत्ताधारी पक्षाचे समर्थक विकासाच्या गोंडस नावाखाली त्याच समर्थन करतील आणि विरोधक प्रथेप्रमाणे गळे काढतील. दरम्यान पुन्हा एकदा एखादं "महाड" घडेल आणि हेच चक्र पुन्हा पुढे सुरु राहील. *********************************************** - देखो, क्या चाहिये तुमको? "सिर्फ सच, नो मोर गेम्स, सच।" - सच? सच डरावना है, दिल दहल जायेगा। सरकार भ्रष्ट है यह सच नही हैं। भ्रष्टाचार के लिये हि सरकार है, यह सच हैं। - ये जो अखबारों में, टीव्ही पे जो खबरे सुनने में आती है; सत्तर हजार करोड - एक लाख करोड - दो लाख करोड, ये अजिबसी इम्पोस्सिब्ल रक्कम . . . . ये असल में . . "ये एक्सिस्ट करती है, हम में से कईयों के पास है, हम बाट के लिए है। -चाहे कुर्सी पे बैठे हो या नही बैठे हो, दुसरा बैठा हो, दुकानदारी चलती रहती है। "गव्हमेंट कॉन्ट्रॅक्टर है तो ऑपोझिशन ठेकेदार। करोडो अरबो का ठेका है, अकेले से नही होगा। - हां तो १२० करोड के बारे में सोचने का टाइम कब होगा? "१२० करोड? मॅथ्स गडबड है तुम्हारा। बटे हुए हो तुम लोग, धर्म - जाती - प्रांत। हम फिगर अनालाईज करते है। १२० करोड नही, टुकडे, छोटे छोटे टुकडो में बटे हुए हो। लकडी का बंडल नही, अलग अलग लकडिया, जो टूट जाती है आसनी से। तभी तो हम तुम्हे . . . जुतीयो के नीचे रौदते है हम तुम्हे। - तो ये कोई स्कॅम स्कॅम नही है। ये असल में आप लोग का प्रायमरी धंदा है। "राईट" - लेकिन हम लोगों को खुश करने के लिये भी तो आप बहोत कुछ करते हो। "हां, युनिफॉर्म तक पहनते है। देखो, जीन्स पहने हुए हम में से किसी को देखा है कभी आजतक? और पार्लियामेंट जाते है, असेम्ब्ली जाते है, वहा जा के बहस करते है। धूप में, गर्मी में भाषण देते है और वोट भी तो मांगते है। जो अच्छे हैं, होनेस्ट है, उन्हे साईड कर देते है। वो तो बस्स डेकोरेटिव्ह पीस है हमारे लिये। पॉवर उन्ही के हाथो में है जो कमा के दे सके। और वैसे गलती तो तुम्हारी है , हम सपने दिखाते है, लेकिन तुम देखते हो। सच्चाई दिखती हि नही है। सडक कहा से बननी है पहले हमे पता चलता है। तो आसपास कि बेनामी जमीने हम हि खरीदते है, हम हि सरकार को बेचते है और हम हि प्रॉफिट कमाते है। और डिटेल में जाऊ क्या? मैने तो अपना पोलिटिकल करिअर अपने बेटे के लिये कुर्बान कर दिया। लेकिन धंदा बंद नही होगा। प्रायमरी बिझिनेस, कहा ना तुमने प्रायमरी बिझिनेस। और ये डण्डा, पुलिस, कॉन्स्टिट्यूशन; वो बस तुम लोगोंको डराने के लिये। बस्स ठीक है? खुश? जीत गये तुम? ह्याप्पी एंडिंग? *********************************************** मागे एकदा मी लिहिलं होतं ते लिहिण्याची दुर्दैवी वेळ पुन्हा पुन्हा येतेय . . . "राष्ट्र म्हणून कधीच आपण एक नव्हतो, नाहीत आणि नसणार." कधी कधी मला पाकिस्तान्यांचे आभार मानावेसे वाटतात (तुमच्या जबाबदारीवर तुम्ही याचा वेगळा अर्थ काढण्यास स्वतंत्र आहात) ते यासाठी कि त्यानिमित्ताने का होईना आमचा राष्ट्रवाद जागा होतो. तुम्हा आम्हा सर्वाना सिस्टिम सुधारण्याची गरज वाटते. पण त्याची सुरुवात स्वतःपासून करता येत नाहीये हीच खरी शोकांतिका आहे. @शैलेंद्र दिंडे ०४/०८/२०१६

सोळावं वरीस नोकरीचं

आज माझ्या नोकरीची १६ वर्ष पूर्ण होतायत. काय काय झालं या १६ वर्षात …! खिशात ८०० रुपये, एक वस्त्र ***वर अन दुसरं दांडीवर अशा अवस्थेत मुंबईत आलो . . . जगण्याचा मार्ग शोधण्यासाठी. स्वप्न वगैरे खूप मोठे शब्द होते माझ्यासाठी त्यावेळी. घाटकोपरला चुलत काकांकडे खाण्यापिण्याची, राहण्याची सोय होती. हातात विद्युत अभियांत्रिकीची पदविका, डोळ्यासमोर गावी माझ्या शिक्षणासाठी गहाण पडलेली शेती आणि मीच काहीतरी भलं करू शकेन या आशेने कपाळाच्या खोबणीत खोलवर डोळे गेलेले आई वडील आणि भाऊ; एवढाच काय तो नजारा सतत तरळत असायचा. आल्या आल्या डझनभर कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केले. उत्तर येण्याची आशा तशी धूसरच. माझे अजून एक चुलत काका तत्कालीन बी. एस. इ. एस. कंपनीमध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. त्यांच्याच सल्याने आणि ओळखीने मी बी. एस. इ. एस. मधील मुख्य अभियंता श्री एस के पटेल साहेबाना सर्व कागदपत्रे घेऊन भेटलो. ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही मिळालेले उत्तम मार्क्स आणि कागदपत्रांच सादरीकरण पाहून साहेब खुश झाले. त्यांनी तत्काळ मला मानव संसाधन विभागाच्या तिवारी साहेबांना भेटायला सांगितलं. एवढंच नाही तर अर्जावर लेखी परीक्षा व मुलाखतीला बोलावाण्यासंबंधी शेराही मारला. अर्ज जमा केला. साधारण आठवड्याभराने लेखी परीक्षा आणि मुलाखत होणार होती. घरी येउन निश्चिंत झालो. तीन एक दिवसांनी रात्री १०:३० च्या आसपास आम्ही सर्व जेऊन टी. व्ही. पाहत बसलो होतो. डोर-बेल वाजली म्हणून काकांनी उठून दरवाजा उघडला. कोणीतरी अनोळखी व्यक्ती हातात एक पाकीट घेऊन "शैलेंद्र दिंडे नावाचं कुणी इथं राहत का?" अशी चौकशी करत होता. काकांनी होकारार्थी उतर देताच त्याने ते पाकीट काकांच्या हातात सोपवलं आणि म्हणाला, "हे पाकीट चुकून इंदिरा नगरच्या माझ्या पत्यावर आलं होतं. आत बी एस इ एस च कॉल लेटर आहे म्हणून घेऊन आलो." मी उठून त्याला पाहायला आणि आभार मानायला जाणार त्याअगोदर तो बाजूच्या बोळातून गायब ही झाला. मनाला एक चुटपूट लागून राहिली . . . कायमची! दोन तीन दिवसांनी लेखी परीक्षा, मुलाखत वगैरे सर्व व्यवस्थित पार पडलं. नेमणुकीच पत्र हातात पडलं. १२ ओगस्ट १९९८ . . . . नोकरीचा पहिला दिवस ते आजपर्यंत मी "त्या" देवदूताला शोधतोय. का . . . ? मुंबईतलं पहिलं पाऊल ते आत्तापर्यंत . . . परत मिळवलेली जमीन, स्वत:च घर, चारचाकी, अजून बरच काही आणि अगदी महत्वाचं म्हणजे आई वडिलांच्या, भावाच्या, नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद-अभिमान; जर त्या देवदुताने "ते" पाकीट माझ्याकडे न पोहोचवता कचऱ्याच्या डब्यात फेकलं असतं तर हे सगळं शक्य झालं असत का? या जगात कोणीही स्वयंभू नाही. आयुष्याच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना बर्याच लोकांची प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे मदत होत असते. त्यांच्याबद्दल सदैव ऋणी राहायला हवं. म्हणूनच मला शून्यातून वर येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. 11/08/2014

माझं इंग्रजी आणि पहिली मुलाखत

माझं इंग्रजी आणि पहिली मुलाखत. ************************************* ६ ऑगस्ट १९९८, वेळ दुपारी ३ ची. लेखी परीक्षा पास झालेले आम्ही १२-१३ जण सांताक्रूझच्या जुन्या ऑफिसमध्ये पहिल्या माळ्यावर मुख्य-अभियंत्यांच्या कॅबीन बाहेर उभे होतो. त्यातला एक सोडून बहुतेक सर्व फ्रेशर. काहीजण फाडफाड हिंदी - इंग्रजी बोलणारे. आता या सर्व परीस्थित आपल्यासारख्या इंग्रजी मिडीयम चा डिप्लोमा सुद्धा मराठीत शिकलेल्या उमेदवाराचा टिकाव कसा लागणार ह्या काळजीने हृदय आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होतं. सुरुवातीलाच दोन उमेदवारांची विकेट पडल्याचे कळल्याने स्वेद-ग्रंथींनी शरीराला थंड ठेवण्याच आपलं काम चोख बजावायला सुरुवात केली होती. हे कमी कि काय म्हणून एका महाशयांनी जाता जाता मुलाखतीच्या pannel वर असलेले करकेरिया साहेब आणि त्यांच इंग्रजी याविषयी सांगून माझा कडेलोटच केला. एवढ्यात माझ्या व अजून एका voltas मध्ये काम करणाऱ्या उमेदवाराच्या नावाचा पुकारा झाला. दोघेही आत गेलो. कौटुंबिक पार्श्वभूमी आणि इतर माहिती विचारून झाल्यावर तांत्रिक प्रश्न सुरु झाले. बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं मी जमेल तेवढ्या अचूक इंग्रजीत देण्याचा प्रयत्न करत होतो. एव्हाना माझी भाषेची अडचण pannelists च्या लक्षात आली होती. आणि ती वेळ आली. एका बेसावध क्षणी करकेरिया साहेबांनी एक प्रश्न माझ्या दिशेने फेकला, "Can you expand SF6?" अगोदरच माझ्या इंग्रजीची बोंब, त्यात EXPAND म्हणजे "प्रसरण पावणे" हा एकाच अर्थ मला माहित होता. त्यामुळे मनातल्या मनात " Yes, we can expand SF6 by releasing pressure on it." असं उत्तर तयार होत होतं. पण नेहमीच्या सवयीने मी थोडा पॉझ घेतला. तेवढ्यात बाजूला बसलेल्या अजून एका साहेबांनी SF6 चा फुल फॉर्म काय? असं विचारलं. अचानक दहा हत्तींच बळ आल्यासारखं मी खणखणीत उत्तर दिलं, "सल्फर हेक्झाफ्लोरायीड." OK You can go now. बाहेर आलो. तेवढ्यात शिपायाने मला बोलावून घेतलं. बहुतेक आपलीही विकेट पडली कि काय या विचाराने पावलं जड झाली होती. त्याने सरळ येउन माझे हात हातात घेतले व अभिनंदन केलं. "तुझं सिलेक्शन झालंय" ह्या त्याच्या वाक्यातून त्यावेळी मला मिळालेला आनंद मी शब्दात कसा व्यक्त करू?

मराठ्यांनो ... उघडा डोळे, पहा नीट!

आमच्या मराठा समाजाची वाट आमच्याच दादा - काका - भाऊ - बंटी - घंटी आणि तायड्यांनी खादी लेवून लावली आहे. पण आमच्या पोरांना ते कळत नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर खण - दीड खण घरात पुन्हा भिंती उभ्या राहतात. भाऊ भावाचा वैरी होतो. जमिनीचे तुकडे पडतात. तेच तुकडे मग बडेजाव करण्याच्या नादात पुढाऱ्यांच्या घशात जातात. ९८ साली कॉलेज संपताच मला माझ्या एका काकांनी निरोप दिला होता, "उद्या आपल्याला कारखाण्यावर जायचंय, आपलं काम हुतंय तिथं." मी तेव्हा स्पष्ट नकार दिला होता. तोच माझ्या पत्त्यावर पडला. नाहीतर नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्यातच जिंदगी खर्ची पडली असती. कालपर्यंत तंबाखूचे वांदे असलेला दादा - काका - भाऊ - बंटी - घंटी पाचेक वर्षात एसयुव्ही मधून फिरायला लागतो. गळ्यातला जोतिबा - नाईकबाचा काळा धागा जाऊन त्याजागी सोन्याचा गोफ लटकायला लागतो. दावणीची हाडकुळी बैलं जाऊन शर्यतीच्या बैलांचा शौक सुरु होतो. एखादं दुसरा पोकलेन किंवा गेला बाजार जेसीबी अंगणात झुलायला लागतो. सोन्याच्या झगमगाटाने वैनींचा मूळचा सावळा रंग बदलून त्यांची पिवळी जर्द धामिण बनते. . .. ... . . . . . . आणि त्यांची थोरवी (?) गाताना आमच्या गण्या - शिरप्याच्या तोंडातला तीळही ओला होत नाही. एक क्षणही आमच्या गण्या - शिरप्याला दादा - काका - भाऊ - बंटी - घंटी च्या यशाचं गुपित जाणून घ्यायची अक्कल येत नाही. दादा - काका - भाऊ - बंटी - घंटी च्या मागं मागं फिरलं कि यांच्या चहा - पाण्याची आणि रात्रीच्या पेयपानाची व्यवस्था होते. एकदा धुंदी चढली की मग मागच्यांचा विचार करायची गरजच उरत नाही. दिवसेंदिवस वाटण्यांमुळे कमी होत जाणारं पिकाऊ क्षेत्र, शिकायला जावं तर वारेमाप फी आणि शिकलं तरी नोकरीची बोंबाबोंब यामुळे मराठा समाज भयंकर कात्रीत सापडलाय. आजकालच्या मोर्च्यांमध्ये याची झलक पाहायला मिळतेय. पण याही परिस्थितीत गर्दीचा फायदा उठवण्यासाठी राजकीय श्वापदं जीवाचं रान करतायत. यातूनच मग ऍट्रॉसिटीचं बुजगावणं उभं केलं जातंय. या कायद्याचा गैरफायदा घेतला जातोय हे १००% खरं आहे. पण हा सामान्य मराठा युवकाचा प्रश्न कसा काय असू शकतो? आजपर्यंत आपल्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी दोन्ही समाजात झुंजी लावणारे नेते कधी या कायद्याखाली "आत" नाही गेले. "आत" गेले ते सामान्य मराठा युवक. जर आम्ही आमची अक्कल नीट वापरली तर १८शिट्टी ला घाबरायची गरज काय? गण्या - शिरप्या हो . . . उघड डोळे अन पहा नीट. नाहीतर पुढची पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. @शैलेंद्र दिंडे १०.०९.२०१६

बदलाची सुरुवात स्वतःपासून

प्रसंग साधारण १५ वर्षांपूर्वीचा आहे. स्थळ : बावला मस्जिद समोर, डिलाईल्स रोड. संध्याकाळच्या वेळी मी एका भैय्याच्या गाडीवर कलिंगडाचा आस्वाद घेण्यात मग्न. एक तिशीतला सभ्य कॅटेगरीत मोडणारा गृहस्थ माझ्याच बाजूला उभा होता. त्यानेही दोन फोडी खाल्या, काही पार्सल घेतल्या. त्याचे पैसे भैय्याला चुकते केले. पाठीमागून एक तरुण आला. भैय्याच्या कानाखाली कडकडीत जाळ काढला. क्या बे माXXचोX , हमसे पैसा लेंगा? तेरेकु मालूम कौन है ये? - मेरे भाऊजी. समझा? आईंदा गलती करेगा ना . . . . (पुन्हा एक लाथ घालून तो आपल्या प्रिय भाऊजींना घेऊन निघून गेला) भैय्या एक हात गालावर आणि दुसरा पार्श्वभागावर चोळत "तो" गेल्याच्या दिशेने "सॉरी भाई" म्हणत आसवं गाळत राहिला. न राहून मी विचारलं, "कौन था वह?" - साब, बीएमसी कि कचरे कि गाडी का मुकादम है। **************************************************** लोक म्हणतात बदल हवा. सुरुवात कोणी आणि कुठून करायची?

अट्रोसिटी आणि मराठा मोर्चा

अजित दादा काही माझा आवडता नेता नव्हे. पण त्यांची (कधी कधी) खरं आणि स्पष्ट बोलण्याची पद्धत मला जाम आवडते. आता आरक्षणाचं गाजर कोणी आणि कशासाठी दाखवलं वगैरे सारखे अड़चणीचे प्रश्न आपण विचारायचे नसतात - फ़क्त समजुन घ्यायचे असतात. अट्रोसिटीचा गैरवापर का - कोणी - कशासाठी केला - करायला लावला हा सुद्धा असाच एक प्रश्न. सध्याच्या चर्चेतून मराठा मोर्चामागे प्रमुख दोन कारणं दिसतायत. एक कोपर्डीची अमानवी घटना व त्यानिमित्ताने अट्रोसिटीचा गैरवापर आणि दुसरं म्हणजे आरक्षण. सबंध देशातल्या महिलांवरील हल्ले आणि अत्याचाराच्या घटना फ़क्त आणि फ़क्त कायदेशीर मार्गाने आणि प्रसंगी संसदेच्या माध्यमातून कायद्यात आवश्यक बदल करून नियंत्रणात येऊ शकतील. हीच बाब अट्रोसिटीबाबत सुद्धा खरी आहे. मोर्चे काढून (कोणत्याही जाती समुहाने) दबाव निर्माण करून जे हाती लागेल त्याला न्याय म्हणता येईल का याचा विचार प्रत्येक सजग नागरिकाने करायला हवा. आरक्षणाच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. घटनेच्या चौकटीच्या बाहेर जाउन केलेला कोणताही प्रयत्न सफल होणार नाही याची कल्पना तत्कालीन आणि सध्य राजकीय वर्गाला आहे. त्यामुळे फ़क्त मोर्चे थोपवण्यासाठी तात्कालिक पोपटपंची केली जाईल. यातून समाजाच्या हाती पुन्हा तंबोराच मिळेल. आज शांततामय मार्गाने चाललेले मूकमोर्चे उद्या सुनामीत बदलणार नाहीत याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. बरं आरक्षण मिळालं तरी त्याने लगेच काही बदल होउन सगळ आबादी आबाद होईल असं नाही. आज प्रत्येक तिनामागे दोन कुटुंब शेती करत आहेत. त्यांच्या समस्यांवर जोपर्यंत कायमस्वरूपी तोडगा दिला जात नाही तोपर्यंत फार काही क्रांतिकारक घडेल असं वाटत नाही. याचाच दूसरा भाग म्हणजे शिक्षणातील संधी. तमाम शेतकरी वर्गातली पोरं नादारीच्या जीवावर उच्च माध्यमिक पर्यंत पोहोचतात. पण पुढे लायकी असूनही उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचनींचा डोंगर उभा असतो. इथं मागास आणि खुल्या प्रवर्गाच्या शुल्कामध्ये जी अजब तफावत पहायला मिळते ती पुढे जाउन खुल्या प्रवर्गातील उमेदवाराच्या स्वप्नांची राखरांगोळी करण्याबरोबरच सामजिक दुहीचं कारण बनते. या गंभीर मुद्द्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे? किमान आमच्या मराठा समाजातील "शिक्षण सम्राट" दादा - भाऊ - काका यांना यावर तात्काळ इलाज करणं शक्य आहे. पण ते तसं करणार नाहित. कारण आमची गरज पाच वर्षातून एकदाच जाणवते - मतदानावेळी. मराठा मोर्चाच्या निमित्ताने ही पारंपरिक रसद तूटताना पाहून अगदी योग्य ठिकाणी मिरच्या लागलेल्या आहेत हे रोजच दिसतय. कोणाला वाटतय की "ब्राह्मण" मुख्यमंत्र्याचा गेम करण्यासाठीची ही चाल आहे. तर कोण म्हणतो की ही दलित दमननीती आहे. अजुन बरेच गमतीदार आडाखे वाचायला मिळतायत. यात खरं खोटं काय ते माहीत नाही. हो पण ही एकी आपल्या उद्धारासाठी असेल तर एक मराठा म्हणून माझीही एक वीट मी लावु इच्छितो. अन्यथा दुरून डोंगर साजिरे हेच बरं. शैलेंद्र दिंडे १७.०९.२०१६

मराठा मूक मोर्च्यांच्या निमित्ताने ...

मराठा मूकमोर्च्याच्या निमित्ताने ... मराठा समाजाच्या समस्यांचं मुळ आमच्या राजकीय नेतृत्वामध्ये आहे असं माझं ठाम मत आहे. बहुतांश काळ आमचे नेते सत्तेत असुनही त्याचा फायदा एकगठ्ठा मतदान करणाऱ्या सामान्य मराठ्यापर्यंत फारसा पोहोचलेला नाही हीच बाब मोर्च्याला मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादातुन समोर येत आहे. नेत्यांच्या करोडो - अब्जोंच्या उड्डानांचा राग मात्र अजुन कुठे व्यक्त होताना दिसत नाही. दुसरीकडे उपलब्ध आकडेवारी बघितली तर अट्रो्सिटीचा आणि आमच्या आर्थिक दृष्ट्या मागास राहण्याचा काडीचा संबंध नाही हे स्पष्ट दिसतय. अट्रो्सिटीची दहशत मात्र गावखेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. पण पुन्हा या कायद्याचा वापर (सर्वपक्षीय) नेत्यांनीच एकमेकाला संपवायला केल्याचं दिसेल. आमची खरी दुखरी नस म्हणजे बेभरवशाचा शेती उद्योग आणि उच्च शिक्षण घेताना होणारी कोंडी. व्यापारी तत्वाचा अभाव आणि तोट्यात गेली तरी परंपरा म्हणून शेती कसलीच पाहिजे हा अट्टाहास आमच्या मुळावर उठलाय. कुटुंबात दोन मुलगे असतील तर एक नोकरीत पण दूसरा शेतीतच खपला पाहिजे हा समज आजही बहुतांश ठिकाणी दृढ़ आहे. यातून नोकरीवाला पुढे जाण्याचा प्रयत्न करतानाच बेभरवशाची शेती पाय मागे ओढायला सतत टपुन बसलेली असते. शेवटी बेरीज शून्य. आमच्या समाजातील नेत्यांना शेतीपुरक तसेच शेतमाल प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात उभे करून शेती आणि रोजगाराचा प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवणं सहज शक्य होतं. काही सन्माननिय अपवाद वगळता हे काम पुरेशा प्रमाणात झालच नाही. काही नेते मात्र एक्स्ट्रा स्मार्ट निघाले. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून लालुच देऊन सामान्य शेतकर्याकडून पैसा जमा केला आणि सत्तासोपानाचा वापर करून स्वत:च्या वतनदाऱ्या निर्माण केल्या. सामान्य जनता मात्र शोषनाच्या दुष्ट चक्रात तशीच अडकून पडलेली आहे. यातून बाहेर पडून शिक्षण घ्यायला जावं तर तिथेही निराशाच पदरी पड़तेय. नादारीच्या भरवश्यावर पोरं कसंतरी दहावी - बारावीपर्यंत पोहोचल्यावर पुढे उच्च शिक्षण घेउन कुटुंबाचा उद्धार करण्याची ते स्वप्नं पाहू लागताच तिथं व्यवस्था आड़ येतेय. आरक्षित आणि खुल्या वर्गातल्या शुल्कातला अवाढव्य फरक पाहून त्याच्या डोक्यात पहिली ठिणगी पड़ते. गुणवत्ता असुनही डावललं गेल्याचं शल्य तो कधीच विसरु शकत नाही. स्वत:च्या फायद्यासाठी कायदे बनवणाऱ्या आणि अस्तित्वात असणारे कायदे हवे तसे वाकवणाऱ्या आमच्या xyz सम्राट नेत्यांना "आपल्या" मतदार वर्गाला दिलासा देणं इथं सहज शक्य असलं तरी ते असं करत नाहित. कारण त्यांचा मैनेजमेंट कोटा फ़क्त स्वत:च पोट भरण्यासाठी असतो. सध्याचे मराठा समाजाचे मोर्चे स्वत:च्या उद्धारासाठी आहेत की कोणाच्या निर्दालनासाठी, आरक्षण मिळणार किंवा नाही - मिळाल्यास ते कोर्टात टिकणार की नाही, अट्रो्सिटीत बदल होणार की रद्द होणार हे सर्व चर्चेचे मुद्दे होऊ शकतात आणि तशी चर्चा व्हायला हवी. पण या आडून काही लोकांची जी शेरेबाजी सुरु आहे ती फ़क्त निंदनीय आहे. अगदी न भूतो न भविष्यती अशा प्रकारच्या शिस्तीने निघणारे लाखोंचे मोर्चे ही खरोखरच प्रशंसनीय बाब आहे. त्यावर विकृत शेरेबाजी करून आपले खरे संस्कार कृपया बाहेर काढु नयेत ही माफक अपेक्षा आहे. मी स्वत: आरक्षणाच्या बाजूने नाही. आजच्या आरक्षणाचं स्वरूप निव्वळ "मागासांना प्रतिनिधित्व" हे नसुन "गरीबी हटाव" असं झाल्याची अनेक उदाहरणं देता येतील. कदाचित या मोर्च्याच्या निमित्ताने "समुद्र मंथन" होउन सर्वच समाजातील आर्थिक मागासांना समान संधी उपलब्ध झाली तर.....? विचार करा आणि विकृत शेरेबाजीपासुन स्वत:ला दूर ठेवा. @शैलेंद्र दिंडे २२.०९.२०१६

पवन रघुनाथ आहेर

काही माणसं आपल्या कार्यपद्धतीने जिथं तिथं आपला ठसा उमटवत असतात. त्यातलाच एक म्हणजे पवन आहेर. त्याचा आणि माझा परिचय - ओळख - मैत्री १९९६ पासूनची. शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरच्या हॉस्टेलवर आम्ही रहायचो. होस्टेलवर राहणाऱ्या गाबड्यांच्या अंगात जेवढे काही किडे असतात ते सगळे ह्या एका नरपुंगवाच्या अंगात ठासून भरलेले होते. त्यामुळे फॉर्मल ओळख वगैरे कधी कोणत्या राड्याच्या वेळी झाली हे नक्की सांगता येणार नाही. एवढ्या नाना कळा अंगात असणारा मनुष्य सिव्हिल इंजिनिअर बनल्यावर नेमक्या कशा बिल्डिंग बांधणार हा माझ्या दृष्टीने कायम औत्सुक्याचा विषय. कॉलेज संपल्यावर जवळपास १५ -१६ वर्षे काहीही संपर्क नव्हता. दोनेक वर्षांपूर्वी झुक्याच्या कृपेने पुन्हा आमची भेट झाली. सायबांनी सिव्हिल इंजिनिअरिंगला रामराम ठोकून फॉरेस्ट खात्यात नोकरी पत्करल्याच कळलं. हे ऐकून मला अजिबात धक्का वगैरे बसला नाही. आता सरकारी नोकर म्हटलं की जे सार्वत्रिक मत आहे तसंच माझंही मत बनलं. दरम्यान आळेफाटा इथं एका लग्नाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला तेव्हा ओतूर या त्याच्या गावी प्रत्यक्ष भेट झाली आणि माणूस कसा स्वतः मध्ये बदल करू शकतो हे याची देही याची डोळा वगैरे बघितलं. वनखात्याची रुक्ष नोकरी करत असतानाच आपली अंगभूत creativity वापरून सरकारी योजना प्रत्यक्षात कशा राबवता येतील यासाठी हा नेहमी प्रयत्नशील असतो. नोकरीत फक्त पाट्या न टाकता प्रत्येक विषयाची शास्त्रीय माहिती घेऊन काम करणारा आणि ती सामान्य माणसापर्यंत फेसबुक सारख्या माध्यमातून पोहोचवणारा हा बहुतेक पहिला वनरक्षक असावा. हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे आज सायबांचा वाढदिवस. पवन्या, जिकलंस रांड्या! शुभेच्छा तर नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत. बाकी तुझं कामच तुला शिखरावर घेऊन जाईल यात शंका नाही. तुझा शुभचिंतक, शैलेंद्र दिंडे १५/१०/२०१६

कल्पकता ... शोधाची जननी

नॅनो जीपीएस चिप ... कल्पकतेची परिसीमा! नेमकं कधी ते नीट आठवत नाही, आमच्या एका गुरुवर्यांनी निबंध लिहायला सांगितला होता ... इस्त्री वर. आता तुम्ही म्हणाल इस्त्री हा काय निबंधाचा विषय होऊ शकतो का? असंच मलाही वाटलं होतं. हा निबंध लिहिताना आपली कल्पना शक्ती तुटेपर्यंत ताणण्याची मुभा होती. माझ्यासारखी तांत्रिक माणसं एका विशिष्ठ मर्यादेच्या पुढे जाऊ शकली नाहीत. पण "जे न देखे रवी, ते देखे कवी" टाईपच्या काही अवलियांनी मात्र निबंधाला चार चाँद लावले होते. इस्त्रीचं मुख्य काम एका ओळीत खरडून बरंच काही लिहिण्यात आलं होतं. उदा. इस्त्री करताना तिने गाणी ऐकवावी, विशिष्ठ तापमानाला त्यातून आवाज यावा. अलार्म म्हणून वापर करता यावा, वीज नसली तरी काम करेल अशी असावी, तिने माझा गृहपाठ करावा, तिचा मिनी सायकल म्हणून वापर करता यावा, आणि बरंच काही. काही गोष्टी तांत्रिक तर बऱ्याचशा नोबिता-डोरेमोन स्टाईल. शेजाऱ्याचा निबंध वाचला तेव्हा मला वाटलं होतं हे कार्ट परंपरेप्रमाणे मार खाणार. पण असं काही झालं नाही. उलट त्याला शाबासकी मिळाली. मुद्दा असा आहे की साध्या टेलिफोन पासून ते स्मार्टफोन पर्यंत प्रत्येक शोध हा कोणाच्यातरी अचाट कल्पनाशक्तीचं अपत्य आहे. वांझोट्या चर्चा करणारे आणि फक्त एखाद्याची खिल्ली उडवणे हेच इतिकर्तव्य समजणारे याबाबतीत बिनकामाचे (इथं मला वेगळा शब्द वापरायचा होता) ठरतात. नॅनो जिपीएस चिपविषयी पहिल्यांदा वाचलं तेव्हाच हे कोणाच्या तरी रहमानी किड्याचं खोदकाम आहे हे कळलं होतं. पण विचार करा खरंच असं काही झालं तर ....? शैलेंद्र दिंडे १०/११/२०१६

नोटबंदी आणि दंग्याची खाज

आज साप्ताहिक सुट्टीचा दिवस. बराच वेळ तु-नळी वरचे व्हिडीओ पाहण्यात खर्च केला. (घरी लाईव्ह टीव्ही माझ्या वाटणीला येत नाही हे वैश्विक दुःख) यामध्ये एका बाजूला थोर विचारवंत सर अरविंद जी, जागतिक कीर्तीचे नकलाकार श्रीयुत राज जी, जगदभगिनी सु श्री मायावती जी, तर दुसऱ्या बाजूला श्री बोकिल आणि इतर किरकोळ नोटबंदी समर्थक यांचे विचार ऐकले. तर मुद्दा असा की मोदींनी नोटबंदी जाहीर केली ती का केली? पुरेशी तयारी का नाही केली? काळ्या पैशेवाल्यांवर थेट धाडी न घालता सामान्य कष्टकऱ्याला रांगेला का लावलं? नोटांवर उर्जित भाय ची सही कशी आली? इथपासून ते रेड्डीच्या मुलीच्या लग्नासाठी ५०० करोडच्या नोटा कुणी बदलून दिल्या? अंबानीने आपला काळा पैसा "जिओ"त कसा जिरवला? वगैरे तोंडावर लॉजिकल वाटणारे (आणि काही खरेही) प्रश्न समोर आले. जनतेत किती खदखद आहे ह्या बाबतीत प्रत्येकाचा अनुभव कदाचित वेगळा असेल. त्यामुळे हा विषय वादाच्या बाहेर ठेवूया. एक गोष्ट मात्र आहे की ज्यांच्या बुडाखाली खरोखर अंगार लागलाय तिथून बुडबुडे मात्र जोरात बाहेर पडतायत. लोकांची गैरसोय होतेय या निरीक्षणाशी मी १००% सहमत आहे. पण मी स्वतः सुद्धा एक क्षुल्लक सामान्य माणूस असल्याने आणि सुदैवाने अर्थतज्ञ नसल्याने तसेच व्हाट्सअपचे "युज्ड डायपर" टाईपचे मेसेज आल्यास फॉरवर्ड न करता आणि न हुंगता परस्पर विल्हेवाट लावायची सवय असल्याने एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात येत नाही की दंगे का होतील? का भडकतील? मला एक कळत नाही की सर अरविंद जी, राज जी, मा. न्यायालय यांच्याएवढी अक्कल आपल्याला नाही म्हणून दुःख वाटून घेऊ कि अज्ञानात सुख मानून येणारा प्रत्येक दिवस अजून सुखाचा व्हावा म्हणून आशा करू?

आमचा आंदु

आमच्या माळेवाडीची प्राथमिक शाळा नीनु शेठच्या माडीवर भरायची. बालवाडी ते चौथी यत्ता एकाच लांबलचक घरात, मध्ये फक्त कपाटांच पार्टिशन. दोनच गुर्जी . . . दिवसभर पोरांना हाकून हाकून पार दमून जायचे. पण कामावर निष्ठा जबरदस्त. सगळ्या कविता, पाढे सगळ्यांना तोंडपाठ असायलाच हवेत हा जणू अलिखित नियमच. त्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त घोकंपट्टी एके घोकंपट्टी. त्यात आवाजात कसलीही तडजोड नाही चालायची. अगदी कोकरूड फाटा तो शिवची वस्ती आणि वर तामजयच्या टेकापर्यन्त आवाज गेलाच पाहिजे अशी तंबीच दिलेली असायची. आवाज कमी झालाच तर "सुक्काळीच्या, वारणेत दुष्काळ पडलाय का रे?" अशा शेलक्या भाषेत टोमके गुर्जी सुनवायचे. एवढ्याने काम झाल तर ठीक नाहीतर टेबलावर वेताची काठी ठेवलेलीच असायची आमच्या सेवेसाठी. पण काही झाल तरी आमच्या कोणाच्याही बापाची हिम्मत नव्हती गुर्जींना जाब विचारायची. ह्या सगळ्या कष्टाचं चीज व्हायचं ते शाळा तपासणीच्या वेळी. शिराळ्याला तेव्हा बी. डी. हुलवान नावाचे गटशिक्षण अधिकारी होते. सहा फुट उंच, सडपातळ शरीरयष्टी पण करारी चेहरा. भल्या भल्यांची त्रेधातिर्पिट उडायची त्यांच्यासमोर. अशाच एका तपासणीवेळचा प्रसंग. नेहमीप्रमाणे सकाळी १० ला येणारे साहेब दुपारी ३ वाजता आले. माडीचा जिना चढून वर येताच आम्ही "एक साथ नमस्ते" चा घोष करून सायबांच स्वागत केल. येताच त्यांनी शाळेची काय बाय रजिस्टर चेक केली आणि ते आमच्याकडे वळले. इथ आमची कमी पण गुर्जींचीच कसोटी असायची. पण वर्षभर घेतलेल्या मेहनतीमुळे गुर्जी तसे निश्चित असायचे. सायबांनी एकेक पोराला उभ करून कोणाला पाढे, कोणाला अजून काही प्रश्न विचारले. खणखणीत उत्तर ऐकून जरा खुशीतच त्यांनी एखादी कविता म्हणून दाखवा अशी फरमाईश केली. कधी नव्हे तो आमचा आन्दु मागून केकाटला, "सायब, मी म्हणू?" आतापर्यंत सगळ नीट चाललं होत. पण आन्दुच्या आगावूपनामुळे गुर्जींच्या काळजाचा ठोका चुकला. राग आणि भीतीमिश्रित हास्य करून गुर्जींनी 'इर्शाद" म्हटलं आणि आन्दु गाऊ लागला. फुलपाखरू! छान किती दिसते । फुलपाखरू . . कस बस पुढच एक कडव गायला आणि वाघान ट्र्याक बदलला . . . . . कुण्या गावाचं आल पाखरू, बसलंय डौलात, खुदकन हसतंय गालात । मैदान मारल्याच्या थाटात आन्दु क्रमाक्रमाने सायबाकडे आणि गुर्जींकडे पाहत होता. इकडे सायबाच्या भीतीने दाबून ठेवलेल्या हास्याचा स्फोट झाला आणि सगळी कार्टी घोड्यासारखी खिदळायला लागली. सायबाच्या करारी चेहऱ्यावरपण गब्बरसदृश्य हास्याची लकेर उमटली. ते बघून आमच्या दोन्ही गुर्जींची अवस्था मात्र गब्बरच्या समोर उभ्या असलेल्या शोलेतल्या "त्या" तिघांसारखी झाली होती. @शैलेंद्र दिंडे. 24/09/2015

नोटबंदी

नोटबंदीचा निर्णय विचारी - अविचारी, फायद्याचा - तोट्याचा, योग्य - अयोग्य वगैरे सर्व येत्या महिन्याभरात अजून स्पष्टपणे कळेल. आम्ही अर्थतज्ञ नसलो तरी आशावादी आहोत. आजची दिसत असलेली परिस्थिती ट्रान्झिशन फेजचा एक भाग आहे (असावा) असं मनोमन वाटतंय. पण एका बाजूला गरजेच्या हजार दोन हजार रुपड्यांसाठी जनता ताटकळत असताना दुसरीकडे लाखो करोडोचं नवं चलन जप्त होतंय हे पाहिलं कि उद्विग्न व्हायला होतंय. एका गोष्टीचं मात्र आश्चर्य वाटतंय कि ज्या बँकिंग चॅनेलच्या भरवशावर व्यवस्था परिवर्तनाचा घाट घातलाय, तो सामान्य जनतेशी द्रोह करून आपल्या तुंबड्या भरण्यासाठी पुन्हा पुंजीपतींची साथ देतोय आणि तथाकथित, नवोदित अर्थतज्ञ त्यावर काही न बोलता सरकारच्या नावाने खडे फोडण्यात धन्यता मानतायत. इथं माझ्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणजे संबंधित विभागाकडून जोरात कारवाई सुद्धा होत आहे. (पुन्हा हा फार्स ठरू नये ही अपेक्षा) जिल्हा सहकारी बँकांना पैसे न पुरवल्याने शेतकरी आणि इतर ग्रामीण जनता त्रस्त आहेच हे नाकारता येणार नाही. पण खरंच हा पैसा त्या बँकांना पुरवला असता तर आता जेवढी रक्कम शेतकऱ्यांना मिळतेय तेवढीही मिळू शकली नसती. कारण ज्या शेतकऱ्यांचा कैवार घेऊन "सहकार" फोफावलाय त्यातुन कोणाच्या तुंबड्या भरल्या गेल्यात हे गावातलं शेंबडं पोरं सुद्धा सांगू शकेल. ह्याच काळ्या तुंबड्या सफेद करण्यासाठी नवं चलन वापरलं नसतं हे कोणी मायचा लाल छातीठोकपणे सांगू शकेल काय? आजची चलन टंचाई भीषण होण्यामध्ये या घटकाचा सुद्धा मोठा हिस्सा आहे. स्वातंत्र्याची चळवळ गांधीजी आणि इतर नेत्यांनी जनआंदोलन म्हणून राबवली आणि यशस्वी करून दाखवली. असा उल्लेख मोदींनी 'स्वच्छ भारत अभियान' लाँच करताना केल्याचं आठवतंय. मला वैयक्तिकपणे हे पटलंय. त्यामुळे कोणतीही सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपला खारीचा वाटा असावा असं मला वाटतं. त्याचाच भाग म्हणून माझ्या बरोबर काम करणाऱ्या चार अशा कामगारांना मी इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग स्वतः चालू करून दिलंय ज्यांनी दहा बारा हजारांचे स्मार्ट फोन फक्त गेम खेळणे आणि पायरेटेड मुव्ही डाऊनलोड करून पाहणे यासाठीच वापरला होता. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गरजू पर्यंत बँकिंग विषयीची माहिती पोहोचवण्याचा मी जाणीव पूर्वक प्रयत्न करतोय. त्यासाठी "भक्त" असण्याची गरज नाही. सध्या एकमात्र बरं झालंय. आपल्या प्रत्येक पोस्ट आणि लेखामध्ये "भक्त" म्हणून समोरच्याला साद घातली की आपल्या सात पिढ्या पवित्र झाल्याचा फील काहींना येतोय. आपली उंची पाव इंचाने का होईना वाढल्यासारखं वाटतंय. लोकसभा प्रचारादरम्यान गर्दीत मुंड्या खाली घालुन सोनिया-मनमोहन यांच्यावर अर्वाच्य टिप्पण्या करणारे आता गर्दी कमी झाल्यावर साव असल्याचा आव आणून उपदेशाचे डोस पाजतायत. असो! शेवटी निष्पक्ष हा शब्द फक्त डिक्शनरीत उरलाय. यात मी सुद्धा नामानिराळा नाही. काही सन्माननीय अपवाद असतील तर त्यांना नमन! "एकमेका साहाय्य करू, ..........." हे अमलात आणायला काही हरकत आहे का? शैलेंद्र दिंडे १४/१२/२०१६

यूपीचं पानिपत

युपी निवडणूक निकालातून हे सिद्ध होतंय कि स्युडो सेक्युलरांना (पक्षी फेक्युलरांना) सामान्य जनतेने मजबूत कोलवायाला सुरुवात केलीय. दुसरं म्हणजे उठसुठ जातीपातीच्या नावावर मतांचा जोगवा मागणाऱ्या जोगत्यांना आता नवीन धंदा शोधावा लागेल. उजव्या विचारसरणीच्या पक्षांची मुस्लिम आणि मागासांना सतत भीती दाखवून आपलं उखळ पांढरे करण्याचे दिवस आता सरलेत एवढं जरी बहेनजीना कळलं असत तर ईव्हीएम वर खापर फोडून हसे करून घेण्याऐवजी त्यांनी आत्मचिंतन केलं असतं. पण असं घडलेलं नाही आणि घडणारही नाही. एकदा 'मसीहा' किंवा 'तारणहार' च्या भूमिकेत घुसल्यावर पुन्हा त्यातून बाहेर येणं आणि नव्या प्रकारचं राजकारण करणं हे तितकंसं सोपं नाही. आजपर्यंत ज्यांनी फक्त आणि फक्त जातीच्या नावावर राजकारण केलं त्यांनी 'हिंदू पोलरायझेशन' वर आक्षेप घेणं यासारखा बाष्कळ विनोद शोधून सापडणार नाही. अर्थात कोणत्याही जातीधर्माच्या नावावर होणारं पोलरायझेशन वाईटच. पण आक्षेप कोणी घ्यावा? 'सौ चुहे खाके बिल्ली चली हज' वगैरे म्हणी अशाच नाही जन्मल्या. हे सर्व 'स्युडो' स्वतःच्याच बोजाखाली दबून मरण्याची शक्यता जास्त आहे. युपी निवडणुकीत भाजपच्या वचननाम्यात 'राम मंदिर' होतं कि नव्हतं ते माहित नाही. पण याची काळजी भाजपला कमी, इतरांनाच जास्त लागली आहे. राम मंदिर हा करोडो हिंदूंचा जिव्हाळ्याचा विषय असला तरी त्यावर येणाऱ्या सरकारने फार घाई करू नये असं मनोमन वाटतं. भाजपला (पक्षी मोदींना) देशभरात वाढणारा पाठिंबा पाहिला तर किमान २०२४ पर्यंत तरी धोका वाटत नाही. यादरम्यान मंदिर कधीही बांधता येईल. पण पहिल्यांदा जनतेच्या जिव्हाळ्याचे रोजगार, उद्योगधंद्याचे प्रश्न आणि शेतीतल्या समस्या मार्गी लावता आल्या तर २०२४ च्या पुढेही सत्ता अबाधित राहू शकेल. शेतकरी कर्जमाफी सारख्या लोकानुनय करणाऱ्या आणि व्यापक अर्थाने शेतकऱ्याला परावलंबी बनवणाऱ्या योजनांची पुन्हा गरज लागणार नाही अशी व्यवस्था मोदी सरकारला निर्माण करता आली तर आम्हा तमाम कि-बोर्ड बडव्यांचे श्रम कामी आले असं म्हणता येईल. शैलेंद्र दिंडे. १२/०३/२०१७

डॉक्टर्स आणि ट्रस्ट डिफिशिट

२००८ - ०९ च्या दरम्यान तब्ब्येतीच्या किरकोळ कुरबुरी सुरु झाल्या होत्या. शिफ्ट ड्युटीमुळे खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, सततचे प्रवास, बाहेरचे उद्योग (बाहेरख्याली नव्हे), नियंत्रणाबाहेरील काही गोष्टींचा ताण आणि अपुरी झोप ही त्याची कारणं आहेत हे ही कळत होतं पण वळत नव्हतं. याच दरम्यान एक छोटासा अपघात झाला आणि सक्तीने आठ दिवस आराम करावा लागला. पुन्हा कामाला लागल्यावर अगोदरच्या किरकोळ कुरबुरींनी जास्त त्रास द्यायला सुरुवात केली. मित्रमंडळींबरोबर लक्षणं शेअर केल्यावर बऱ्याच जणांनी डायबिटीस'ची शक्यता बोलून दाखवली. डायबिटीस संदर्भात एकच माहित होतं की एकदा हा आजार जडला कि तो जन्मभर पाठ सोडत नाही. यात बऱ्याचदा डॉक्टर लोक खूपच भीती घालतात आणि पेशंटची वाट लावतात हे फक्त ऐकून होतो. त्यामुळे डॉक्टरकडे जायला मन धजावत नव्हतं. पण दुसरा पर्यायही नव्हता. जवळपास सहा महिने चालढकल करत करत शेवटी बोरिवलीचं करुणा हॉस्पिटल गाठलं. पहिल्या भेटीत डॉक्टरांनीही अशीच शक्यता बोलून दाखवली. काहीही औषध लिहून दिलं नाही. मात्र सीबीसी पासून ते सोनोग्राफी पर्यंत ४ - ५ हजारांच्या टेस्ट करायला सांगितल्या. थोड्याश्या अनिच्छेने का होईना मी टेस्ट करून दोन दिवसांनी फॉलो अप साठी गेलो. डॉक्टरांनी माझ्या रोजच्या रुटीन विषयी चौकशी केली आणि सर्व रिपोर्ट काळजीपूर्वक पाहून प्रथम डायबिटीस वगैरेची शक्यता फेटाळून लावली आणि माझा जीव भांड्यात पडला. मात्र बिलुरुबीन का कायतरी वाढलंय आणि त्यामुळे काळजी नाही घेतली तर पुढे जाऊन पित्ताशयात खडे होऊ शकतात असं सांगितलं. विशेष काही पथ्यपाणी वगैरे नाही पण जगायचं असेल तर बाहेरचे सर्व उद्योग बंद करा आणि पुरेशी झोप घ्या असा प्रेमळ सल्ला देऊन एक महिन्यासाठी सकाळी आणि रात्री जेवणानंतर खाण्यासाठी एक गोळी डॉक्टरांनी लिहून दिली. एक महिन्यानंतर काही टेस्ट रिपीट करून मी पुन्हा फॉलो अप ला गेलो तेव्हा बहुतांश बिघडलेले पॅरामीटर्स बऱ्यापैकी नियंत्रणात आले होते. यात डॉक्टरांच्या 'प्रेमळ' सल्ल्यावर मी तात्काळ केलेल्या अंमलबजावणीचा जेवढा वाटा होता तेवढाच वाटा माझ्या त्यांच्यावरील विश्वासाचा होता जो त्यांनी पहिल्याच भेटीत निर्माण केला होता. आजकालच्या डॉकटर्स वरील हल्ल्याच्या घटना पाहिल्या तर 'ट्रस्ट डिफिशिट' हे सुद्धा त्याच एक कारण आहे. यावरही विचार व्हायला हवा. शेवटी काही असलं तरी अशा हिंसक हल्ल्यांचे समर्थन होऊ शकत नाही.

आत्मविश्वास

***आत्मविश्वास*** काही वर्षांपूर्वी अंधेरी पश्चिमेच्या मेयर हॉल मध्ये एका सेमिनारसाठी गेलो होतो. सेमिनार दरम्यान वक्त्यांनी सर्वांना एक अक्टिविटि सांगितली होती कि प्रत्येकाने एक कोरा कागद घ्यायचा आणि त्यावर तुमचा स्वत:वर किती टक्के विश्वास आहे ती संख्या लिहायची आणि कागद पालथा घालून ठेवायचा. हे लिहिण्यासाठी वेळ फक्त २० सेकंद. सर्वांचे लिहून कागद पालथे घालून झाल्यावर वक्त्यांनी १००% अस उत्तर लिहिलेल्यांना हात वर करायला सांगितले. ४५ ते ५० जणांच्या ग्रुपमध्ये फक्त ५ ते ६ जणांनी हात वर केले. उरलेल्यांनी लिहिलेली उत्तरे तपासण्यात आली. कोणी ५०-५०, कोणी ६०-४० तर कोणी ९९% अशी मासलेवाईक उत्तरे लिहिली होती. अर्थात अशी टक्केवारी का लिहिली याच कोणतही स्पष्टीकरण लिहिणारांकडे नव्हत. अशा सर्व अर्धवट टक्केवारीवाल्यांना वक्त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, "तुमचा तुमच्या जोडीदारावर किती टक्के विश्वास आहे?" सगळे एकसुरात ओरडले, "१०० टक्के" "का बरं? जी व्यक्ती काही वर्षापूर्वी तुमच्या आयुष्यात आली, ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला १००% माहिती नाही, त्या व्यक्तीवर तुमचा १००% विश्वास. मग स्वत:वर असा अर्धवट विश्वास का?," वक्त्यांनी पुढचा प्रश्न केला. सर्व हॉल नि:शब्द झाला होता. "तुमच्याकडे अगाध ज्ञानाचं भांडार असेल, अतूट इच्छाशक्ती असेल. परंतु जोपर्यंत तुमचा स्वत:वर आणि स्वत:च्या क्षमतेवर १००% विश्वास असणार नाही, तोपर्यत तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही." आत्मविश्वास आणि त्याचं आपल्या यशातल महत्त्व यावर एवढ चपखल विवेचन मी त्यापूर्वी कधी ऐकल नव्हत. @शैलेंद्र दिंडे १९/०४/२०१६

दुरून डोंगर साजरे

२२/०४/२०१४ एका शेतामध्ये एक अतिशय सुंदर झाड होत. पाना-फुलांनी बहरलेलं, मधुर फळांनी लगडलेल. येणाजानार्या वाटसरूच अगदी मन प्रफुल्लीत व्हायचं त्या झाडाला पाहून. सगळ काही गुण्यागोविंदाने चाललेलं असताना अचानक एके दिवशी झाडाच्या मुळांनी कुरबुर सुरू केली. वार्याच्या झोक्याबरोबर आनंदाने डोलणाऱ्या पाना-फुलांकडे पाहून मुळे उद्गारली, "तुमच बर आहे राव. स्वच्छ मोकळी हवा, सूर्यप्रकाशाचा आनंद तुम्हाला रोज मिळतोय. वरून येनाजाणारे लोक तुमची स्तुती करतायत ते वेगळंच. आम्ही मात्र कमनशीबी, आयुष्यभर मातीत तोंड खुपसून तुमच्यासाठी अन्नाची व्यवस्था करायची आणि शेवटी त्याच मातीत संपून जायचं." मग काय पानांनीही प्रत्युत्तर दिलं, "आम्हीही तुमच्यासाठी कडक उन सोसून तुम्ही मिळवलेल्या द्रव्याचं रुपांतर अन्नात करतो." फळा-फुलांनी हि मग वादात उडी घेतली, "अरे आम्हा दोघांना मिळवण्याच्या लालसेमुळे मनुष्य तुम्हाला रोज पाणी देतो. नाहीतर पाण्याविना तडफडत तुम्ही कधीच मेला असता." वाद अगदी टोकाला पोहोचला होता. त्याचवेळी बाजूने जाणार्या एका माणसाने हा वाद ऐकला. हा वाद अनाठाई आहे हे त्याला कळत होत. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत. त्यामुळे त्याने त्या सर्वांना एक पर्याय सूचवला. सर्वांनी आळीपाळीने आपल्या भूमिका, काम बदलाव, जेणेकरून एकमेकांच्या सुख- दुख: ची जाणीव होइल. सर्वांच यावर एकमत झालं. ठरल्याप्रमाणे त्या मध्यस्ताच्या सहाय्याने पाना-फुलांनी व फळांनी मुळांची जागा घेतली, तर मुळांनी पाना-फुलांची जागा घेतली. काही वेळ सर्वजण आपल्या नव्या भूमिकेत खुश होते. एवढ्यात उन्हं चढायला लागली, तशी मुळांची उन्हामुळे तलकली व्हायला लागली. तिकडे पाना-फुलांचीही हवा व सुर्याप्रकाशाशिवाय मातीमध्ये घुसमट व्हायला लागली. थोड्याच वेळात त्यांना आपली चूक उमगली. सर्वांनी मध्यस्थाला विनंती केली व आपल्या मूळ भूमिकेत परत आले. ========================================================== समाजात किंवा संसारी जगात वावरताना बर्याच वेळा हा अनुभव आपल्याला येतो. प्रत्येकजण आपलंच काम कस महत्वाच आणि उच्च आहे हे पटवून देत असतो. खर तर कोणाचही काम कमी अधिक महत्वाच किंवा उच्च नीच नसत. सर्वांची कामं, भूमिका ह्या एकमेकाला पूरक असतात. पण हे समजण्यासाठी मानसाच उभं आयुष्य खर्ची पडतं. जेवढ्या लवकर आपण हे समजून घेऊ, तेवढ्या लवकर आपण सुखाच्या दिशेने मार्गक्रमण करु. ========================================================== ता. क :- मूळ कथा कधी, कोठे वाचली, कोणी लिहिलीय वगैरे आठवत नाहीं. पण ज्या कोणी लिहिली असेल त्यांस सलाम.

अभ्यासिकेतले किडे

आजच्या (किमान) पुस्तक दिनी (तरी) प्रांजळ कबुली द्यावी म्हणतो. 😍🤓😜 दहावीला असताना आमचे तेव्हाचे कर्मनिष्ठ शिक्षक शाळा सुटल्यानंतर आम्हा सर्वांसाठी अभ्यासिका चालवायचे ... अर्थात मोफत .... जेणेकरून गोरगरीब आणि ज्यांच्या घरी वीज वगैरे नाही अशांची अभ्यासाची सोय व्हावी. आमचा सात आठ जणांचा ग्रुप तसा अगोदरच बुद्धिमान आणि मल्टीटास्किंग वगैरे होता. समज आणि शिंगं जरा लवकरच फुटली होती समजा. तर दहावीत असलो तरी थोडं ऍडव्हान्स नॉलेज 😷 मिळावं म्हणून आम्ही एक सर्क्युलेटिंग लायब्ररी चालू होती. ज्यांना घरात प्रायव्हसी मिळायची ते हा उच्च पातळीवरचा अभ्यास घरी करायचे आणि बाकीचे रात्रीच्या अभ्यासिकेत "एकवीस अपेक्षित" च्या आत तो ग्रंथ घालून मागच्या बाकावर बसून उपासना करायचे. उच्च शिक्षणाची आवड एवढी जबरदस्त की एकेदिवशी दोन विद्यार्थ्यांच्यात पहिले मैं पहिले मैं करत बा-चा-बा-ची झाली. गणिताच्या जाधव सरांनी दोघांना रंगेहात पकडलं. दोन सनकन कानाखाली पडल्यावर अख्या डायरेक्टर बॉडीची नावं त्यांनी पोपटासारखी सांगितली. सकाळची सामुदायिक प्रार्थना झाल्यावर उत्तरपूजेसाठी मला आणि आमच्या मुखीयाला बोलावनं आलं. अर्थात आमचा मुखीया एका शिक्षकाचा भाचा आणि मी शाळेतला बऱ्यापैकी बरा विद्यार्थी असल्याने फक्त समज देऊन आमची सुटका झाली आणि आम्ही कानाला खडा लावला. पुढे दहावीच्या निकालानंतर शाळेच्या कार्यालयातल्या "गुणवंत विद्यार्थी" यादीत माझं नांव झळकलं आणि जाधव सरांनी दाखवलेल्या विश्वासाचं फळ मिळालं. सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!!! शैलेंद्र दिंडे २३/०४/२०१७

देश प्रथम ...

पंडितजी, इंदिराजी, राजीवजी ग्रेट होते. त्यांनी आपल्या दूरदृष्टीने देशाला प्रगतीपथावर नेलं. हा इतिहास इयत्ता तिसरीपासून वाचत आलोय. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहेच. पण मुद्दा असा कि त्यांच्या पुण्याईवर जगणाऱ्या बांडगुळांना आम्ही किती दिवस उरावर घेऊन बसायचं? आणि का? मूलतः निधर्मी असणारी आणि समानतेचा हट्ट धरणारी घटना सर्वधर्मसमभाव आणि अल्पसंख्य लांगूलचालनाच्या दिशेने अगदी बेमालूमपणे सरकवली गेली. तथाकथित अत्याचारी उच्चवर्णीयांच्या अगदी विसाव्या पिढीलासुद्धा व्हिलन ठरवून कायमचा "गंड" निर्माण करण्यात आला. १४०० वर्षांपूर्वीच्या लिखाणाचा दाखला देत धार्मिक बाबतीत तसूभरही समझोता करण्यास नकार देणाऱ्या "कौम" समोर सर्वाधिक परंपरांना सहजपणे (कधीकधी बळाने सुद्धा) फाटा देऊन आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या समाजास हेतुपुरस्सरपणे आपल्या मिंध्या बुद्धिवाद्यांकरवी सरसकट "मागास" आणि "प्रतिगामी" ठरवलं गेलं. हे पाप कोणाचं? "इथे फक्त आम्हीच (काँग्रेसी) राज्य करू शकतो" या समजुतीतून अजूनही बाहेर न आलेले आणि "ह्यांना (उजवे) काही राज्य करता यायचं नाही" हे बोलणारे ६० वर्षात "बिजली - पाणी - सडक" जाहीरनाम्यातून हद्दपार का नाही झाले याचं उत्तर जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत "तीन वर्षात काय केलं?" हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार त्यांना राहात नाही. प्रचारसभेत फुगवलेल्या बेंडकुळ्या प्रत्यक्ष काम करताना पंक्चर होतात. कारण सभेतल्या भाषणाच्या विपरीत सरकारात काम करताना संविधानिक मर्यादा - कायदे - कानून याच्या कक्षेतच काम करावं लागतं. आता हे काय विरोधकांना माहित नाही का? सगळं माहित आहे. पण भाजपवाल्यानी विरोधात असताना शेण खाल्लं. म्हणून आम्ही आता "x" खाणार हा अट्टाहास. पक्ष कोणताही असो .. सरकारच्या एखाद्या मुद्द्यावरील अपयशानंतर आनंदोत्सव साजरा करणारे जोपर्यंत अस्तित्वात आहेत, तोपर्यंत त्यांना लॉजिकली - इलॉजिकली ठोकून काढणारे सुद्धा आपलं अस्तित्व दाखवत राहणार. मग तुम्ही त्यांना अंधभक्त म्हणून कितीही हिणवत रहा. अलीकडे गोरक्षकांबद्दल असलेला सॉफ्ट कॉर्नर, शेतीविषयक ठोस धोरणांचा अभाव आणि सीमेवरील कुरापतींवरची परंपरागत सौम्य प्रतिक्रिया हे मुद्दे नक्कीच काळजी करायला लावणारे आहेत. सामाजिक सौहार्द, रोजगार निर्मिती, समाजाच्या खालच्या थरातील आर्थिक सुबत्ता आणि आंतरराष्ट्रीय तसेच अंतर्गत सुरक्षा या बाबतीत कमालीचं गोंधळाचं वातावरण आहे. त्यावर ठोस कृती होऊन २०१९ साठी अनुकूल मैदान तयार होणं गरजेचं आहे. छदाम डावे आणि फुटकळ प्रादेशिक पक्षयुक्त कडबोळं सत्तेत येणं हे देशाच्या हिताचं नाही. शैलेंद्र दिंडे १८/०५/२०१७

तिसरी बाजू

"या तो तुम मेरे साथ हो, या फिर मेरे खिलाफ" असले डायलॉग फक्त पिच्चर मध्ये ठीक आहेत. प्रत्यक्ष जीवनात मनुष्य तिसऱ्या बाजूचा सुद्धा असू शकतो. हे मान्य केलं की चर्चा निकोप होते. अन्यथा "माझीच लाल" हा स्टँड आणि निकालपत्र हातात घेऊन केलेली चर्चा निव्वळ घर्षण निर्माण करण्यापलीकडे काहीही कामाची नाही ... नसते. संविधानातल्या कुठल्याशा कलमाला धरून सरकारने गोवंश हत्या बंदी केली असेल (असं इथंच कुणाच्यातरी भिंतीवर वाचलंय) आणि ती चुकीची आहे हे आपलं मत असेल तर ते कायद्याच्या मार्गाने सिद्ध करून सरकारला तोंडावर पाडता येईल. पण तो मार्ग न स्विकारता ऑन कॅमेरा गाय कापून निषेध करणे ह्याला कसलं स्वातंत्र्य म्हणायचं? खरंतर सरकारने लोकांच्या खानपान विषयी भानगडीत न पडता फक्त विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावं हे बहुतांश समर्थकांना वाटतं. गोहत्तेवरून गोरक्षकांनी चालवलेला धुमाकूळ याविषयी सुद्धा बहुतांश सरकार समर्थकांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. पण त्या सर्वांना एकदा भक्त कटेगरीत ढकललं की आपण बुद्धिवादी असण्यावर शिक्कामोर्तब होतं असा गैरसमज अलीकडे दृढ होत चाललेला आहे. त्यातून बाहेर पडा राजे हो. बरं मोदी पंप्र पदासाठी लायक नाहीत असं तुमचं म्हणणं असेल तर ते ही मान्य ... पण किमान आत्ताच्या घडीला लायक पर्याय तरी दाखवा किंवा उभा करा. येत्या दोन वर्षात अपेक्षित बदल नाही घडले तर आम्हाला सुद्धा पर्याय हवाच आहे. कारण कोंबडा माझा अरवू दे किंवा तुमचा ... आम्हाला सूर्य उगवण्याशी मतलब आहे. सरकारच्या धोरणांमध्ये असणारा गोंधळ वस्तुनिष्ठपणे मांडलात तर लोक ऐकतील सुद्धा. पण तीच टिका व्यक्ती केंद्रित झाली तर संघर्ष होत राहणार. त्याला आपल्या बुद्धीने मुद्देसूद उत्तर द्यायची तयारी आहे का? विचार करा.

निवड स्वातंत्र्य

आपले आई वडील कमी शिक्षित असल्यानेच आपल्याला आपल्या आवडीचं करिअर विना दबाव निवडता आलं, असं विश्वास नांगरे पाटील बऱ्याचदा भाषणात सांगतात. (व्हिडीओ आहे बरका 😬) माझ्या बाबतीत सुद्धा योगायोगाने हे खरं आहे. दहावी नंतर बारावी सायन्स आणि पुन्हा डिग्रीचा खर्च झेपायचा नाही म्हणून शॉर्टकटने (अर्धवट) का होईना इंजिनीरिंग करायचं म्हणून डिप्लोमाला (इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग) गेलो. कर्म धर्म संयोगाने डिस्टिंक्शन मध्ये पास सुद्धा झालो. पोरगं काय करतंय असं कोणी विचारलंच तर 'वायरमनचा कोर्स केलाय' असं आमच्या मातोश्री (अभिमानाने) सांगून टाकायच्या. हे ऐकताना मला मात्र मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. 'याचसाठी केला होता (का) हा अट्टाहास?' असं ओरडून विचारावंसं वाटायचं. पुढे लगेचच मुंबईला बीएसईएस'मध्ये सबइंजिनिअर म्हणून रुजू झालो. तरीही मातोश्रींचं भाबडेपण काही कमी झालं नव्हतं. "बाळा, डांबावर (इलेक्ट्रिक पोल) जपून चढत - उतरत जा रं बाबा" असं काळजीपोटी म्हणायची तेव्हा खरंच त्या डांबावर चढून खाली उडी मारावी असं वाटायचं. आमचे आई-बाप कमी शिक्षित, भाबडे असले तरी अडाणी नव्हते... दुराग्रही तर अजिबात नव्हते. त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी माझ्यावर न लादता माझ्या बकुबाप्रमाणे शिकून (जमेल तितकं) मोठं व्हायचं स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं. माझ्या मुलांच्या बाबतीत सुद्धा मी हेच ठरवलंय. (निकालाच्या भीतीने घर सोडणाऱ्या, आत्महत्येस प्रवृत्त झालेल्या तमाम अभागी मुलामुलींच्या आदरणीय मातापित्यांस समर्पित)

इतिहास, पुराण आणि मी

***** इतिहास, पुराण आणि मी ***** मुळात पाठांतर हा माझा पिंड नव्हे. बहुदा इनबिल्ट अभियांत्रिकी मेंदू, त्यामुळे एखादी कन्सेप्ट खोलात जाऊन समजावून घ्यायची म्हणजे विसरण्याचा प्रश्नच नाही. हा सिम्पल फंडा. *** हे अवांतर यासाठी की थोडी स्वतःच स्वतःची पाठ खाजवून घेतल्याशिवाय पोस्टला वजन येत नाही म्हणून *** तर मूळ मुद्दा असा की आम्ही शाळेत असताना आमचे इतिहासाचे शिक्षक (नीट नाव सुदधा आठवत नाही) हे काही इतिहासप्रेमी म्हणून विषय शिकवत नव्हते, तर अंगावर टाकलेली जबाबदारी (पक्षी पाटी असे वाचावे) वाहण्याचं काम करत होते. वर्गात घुसल्या घुसल्या स्वतः पुस्तक उघडणे (मग आम्हीही उघडणे हे योगाने आलंच) आणि सत्यनारायणाची पूजा सांगणाऱ्या भटजींना लाज येईल एवढ्या वेगाने वाचून धडा 'संपवणे' यालाच ते आपलं इतिकर्तव्य माणणाऱ्यातले होते. त्यातून इतिहासातल्या सणसणावळ्या म्हणजे माझ्या कट्टर शत्रू. कितीही घोकंपट्टी केली तरी मेल्या मला काही पावायच्या नाहीत. मग जे जमत नाही, आवडत नाही ते ऑपशनला टाकणं हे ही ओघाने आलंच. पण म्हणून मला इतिहास आवडत नव्हता असं नाही. इतिहासातील प्रत्येक पात्र वाचताना जणू ते अंगात शिरल्याचा भास व्हायचा. सगळंच भव्य दिव्य. बिळाशीच्या मराठी शाळेत चौथी - पाचवीत असताना आम्हाला शाळेत पडद्यावर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बालशिवाजी चित्रपट दाखवण्यात आला होता. पुढे पाटील गल्लीतली आमची झुंड कित्येक दिवस चिनीदांडू आणि गोट्या बाजूला ठेऊन गारवेलच्या छपाट्या तलवारी सारख्या वापरून राजांचा गनिमी कावा आणि लढाया खेळण्यात गुंग झाली होती. 'थोरांचा इतिहास' अभ्यासताना त्या थोरांची जात प्रथम पाहण्याचा नतद्रस्टपणा तेव्हा समाजात भिनलेला नव्हता. त्यामुळे शाहू महाराज हे कल्याणकारी राजा म्हणूनच लक्षात राहिले. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई हे शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते म्हणूनच लक्षात राहिले. लोकमान्य म्हटलं की त्यांचा बाणेदारपणाच आठवतो. सावरकर म्हटलं की जाज्वल्य देशप्रेम आणि बाबासाहेब म्हटलं की त्यांची विद्वत्ताच आकर्षित करते. आपला समृद्ध इतिहास आणि पुराण ही आता काही लोकांसाठी रोजीरोटीचं साधनमात्र राहिलेल्या आहेत. ती रोजीरोटी टिकून राहावी आणि पर्यायाने पुढच्या पिढ्यांची सोय लावता यावी यासाठी रोज नवा इतिहास जन्माला घातला जातोय आणि जाईल. आताची कोवळी पिढी मात्र ह्याचं खरं की त्याचं खरं या दुविधेत एक दिवस इतिहास विषय कायमचा ऑपशनला टाकील आणि तो दिवस सगळ्यात दुर्दैवी म्हणून गणला जाईल. आदरणीय राजीव साने सरांनी आज एक अतिशय छान पोस्ट लिहिलीय, "भूतकाळ बदलत नाही पण त्याचा अर्थ बदलतो म्हणून इतिहासकारांना वाटते आपणच तो घडवतो" नव्या पिढीने यातला गर्भित अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा जुने इतिहासकार आणि नवे उदयोन्मुख इतिहासकार यांच्या वादात एकदिवस आपण एकमेकांपासून एवढे दूर जाऊ की आपल्या प्रत्येक घराभोवती सुरक्षेसाठी तटबंदी उभारावी लागेल. शैलेंद्र दिंडे २२/०६/२०१७

भाभी आणि शकील

कराडच्या एसजीएम कॉलेजला होतो. उशिरा ऍडमिशन झाल्याने कॉलेजचं हॉस्टेल मिळालं नव्हतं. म्हणून मग जवळच्याच नलावडे होस्टेलला कॉट बेसिस वर रहात होतो. सुरुवातीला होस्टेलच्याच तळमजल्यावर राहणाऱ्या एका कुटुंबाच्या मेस मध्ये जेवायला जायचो. गावी असताना कानातून धूर निघेपर्यंत तिखट खायची सवय असल्याने मला काही त्यांचं साजूक जेवण झेपत नव्हतं आणि दिवसातून चारदा हादडायची सवय असलेला (पण नाईलाजाने इथं दोनवेळच्या जेवणावर भागवणारा) 'खाद बोकडाची अन काय लाकडाची' असा मी त्यांना झेपत नव्हतो. नतिजा दुसऱ्याच महिन्यात त्या मावशींनी पहिल्यादा मला हाकलला आणि तिसऱ्याच महिन्यात मेसला टाळं लावलं. अब जाये तो जाये कहा? असा विचार करत असतानाच विद्यानगर रोडवरच्या आणि आमचं हॉस्टेल व कॉलेजच्या मध्यावर असणाऱ्या 'शकील'च्या मेसचा पत्ता कोणीतरी दिला. सुरुवातीला नाक मुरडूनच तिथं गेलो. स्वछता आणि टापटीप फार नसायची. पण तीन गोष्टींसाठी मी तिथं पुढची दोन वर्षे काढणं पसंद केलं. एक म्हणजे जेवता जेवता बघण्यासाठी तिथं एक कृष्णधवल टि.व्ही होता. दुसरं कारण म्हणजे तिथं कितीही खाल्लं तरी खाणाऱ्याकडे तिरक्या डोळ्याने पाहून दातओठ खायची पद्धत नव्हती. घामाने सदा डबडबलेली भाभी मातीच्या चुलीवर चपातीवर चपात्या थापत असायची आणि साधारण आमच्याच वयाचा तिचा शकील प्रेमाने आणि आग्रहाने आम्हाला वाढण्याचं काम करायचा. तिसरं आणि अतिमहत्वाचं कारण म्हणजे पैसे. महिना ३५० रुपये असणारी मेसची फी मी कधीही वेळेवर भरल्याचं स्मरत नाही. परंतु पैसे लेट झाले म्हणून भाभीने कधी आमची आबाळ केली नाही. भाभीच्या कोणत्यातरी सणादिवशी तिने एका मोठ्या ताटसदृश्य भांड्याभोवती मेसमधल्या आम्हा आठदहाजणांना बसवलं आणि बिर्याणी खाऊ घातली होती. सुरुवातीला सगळे एकत्र कसं जेवायचं म्हणून विचित्र वाटलं होतं. पण नंतर मज्जा आली ... अगदी गोपाळकाला केल्यासारखी. या गोष्टीला आता २०-२२ वर्ष होऊन गेलीत. पण भाभी आणि शकीलचे चेहरे आजही लख्ख आठवतायत. मध्यंतरी मुंबईला परतताना एकदा भेटायला जायचं म्हणून मुद्दाम विद्यानगर मार्गे गेलो होतो. पण अंधारात ती झोपडी काही सापडली नाही. पुन्हा केव्हातरी जाऊ असं म्हटलो खरं. पण अजूनही योग आलेला नाही. भाभी आणि शकील . . . दोघांनाही "ईद मुबारक" -- Shailendra Dinde 26/06/2017

जीएसटीच्या आडून

"आले देवाजीच्या मना ..... " या उक्तीप्रमाणे एकदाचा जीएसटी लागु झालाय. आमच्यासारख्या बऱ्याच जणांना अगोदरचा सेल्स टॅक्स, व्हॅट, कस्टम, अमुक तमुक ह्यातलं काही कळत नव्हतंच. त्यात अज्ञानाच्या यादीत आता अजून एका आयटमची भर पडलीय. नोकरदार असल्याने आम्ही सक्तीने का होईना "प्रामाणिक करदाते" या सदरात मोडणारे (शक्य तिथे खाच्या मारणारे सुद्धा). याबाबतीत आमच्या दृष्टीने धंदेवाले अधिक सुखी, कारण त्यांना टॅक्स वाचवण्याचे, चोरण्याचे अनेक मार्ग उपलब्ध. सापडेल तो चोर, बाकीचे साव हा आपल्या देशातला अलिखित दंडक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकताना, मूत्र विसर्जन करताना, पैसे खाताना, गूळ पाडताना लोकांच्या नजरेत न येणं ही एक कला आहे. आमचे बहुतांश देशबांधव (माझ्यासाहित) यात कमालीचे पारंगत आहेत. बाकीचे आपोआप बावळट या सदरात मोडतात हे वेगळं सांगायला नकोच. हे आहे आमच्या देशाचं सामूहिक चारित्र्य, जे इतर देशातली स्वच्छता, नागरिकांचा प्रामाणिकपणा, सचोटी यावर तोंडाला फेस येईपर्यंत बोलताना आणि राजकारण्यांना / ईथल्या व्यवस्थेला शिव्या घालताना आम्हाला चुकूनही आठवत नाही किंवा त्याची लाज वाटत नाही. १ जुलैला जीएसटी लागू झाला आणि त्याच्या आडून ग्राहकांची लूट सुरू केलेल्या हॉटेल्सची बिलं धडाधड सोशल मीडियावर पोस्ट होऊ लागली आहेत. ३० जून पर्यंत ज्या दरात वस्तू मिळत होती त्यात सर्व कर आणि व्यावसायिकाचा नफा अंतर्भूत होता व संबंधीत व्यावसायिक ग्राहकाकडून वसूल केलेला कर प्रामाणिकपणे सरकारी खजिन्यात जमा करत होता हे गृहीत धरून या पोस्ट पडत आहेत, जे की निव्वळ भोळसटपणाचं लक्षण आहे. जे अगोदर कर चोरी करत होते आणि ज्यांच्या अनैतिक नफ्यास जीएसटी मूळे तोशीस लागत आहे तेच लोक अगोदरच्या करासाहित असणाऱ्या (?) किमतीवर पुन्हा जीएसटी आकारून लूट करत आहेत. खरंतर ज्यांना प्रत्यक्ष हा अनुभव आलाय त्यांनी संबंधित यंत्रणेकडे याची तक्रार करायला हवी. पण असं न करता (फक्त) सोशल मीडियावर पोस्टी पाडून सरकारला शिव्या देण्यात आपण धन्यता मानतोय. हा आहे आपल्या सामाजिक भान आणि राष्ट्रनिष्ठेचा आरसा. कोणीतरी मसीहा येईल आणि आपल्या देशाला पुन्हा सोने की चिडीया बनवेल या विशफुल थिंकिंग मधून बाहेर पडून, जबाबदारी घेऊन, प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करेपर्यंत "नेहरू - गांधी - मोदी" ला शिव्या देण्याच्या असीम संधी आपल्याला मिळतंच राहतील. ©शैलेंद्र दिंडे ०४/०७/२०१७

मुंबई, मालिशका आणि खड्डे

दरवर्षी (वर्षानुवर्षे) मुंबईत तुफान पाऊस पडतो. ठराविक सखल भागात पाणी भरतं. नागरिकांचे संसार रस्त्यावर येतात. मुंबईत येऊन मला १९ वर्षे झालीत. पूर्वी मी राहत असलेला डिलाईल रोड, लोअर परेल असेल किंवा काम करत असलेला पश्चिम उपनगरांचा भाग असेल, काही ठिकाणी नित्यनेमाने पाणी भरत असतं. रस्ते खराब होत असतात. वाहतुकीची कोंडी होत असते. दरवेळी महापालिका तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करत असते आणि नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत असतो. आधी संपूर्ण मुंबईतले रस्ते हे महापालिकेच्या ताब्यात होते. ८-१० वर्षापूर्वी यातला काही भाग एमएमआरडीएकडे सोपवण्यात आला होता. दोन्ही संस्थांनी मिळून यथेच्छ गोंधळ घालून ठेवलेला आहे. याचे परिणाम सामान्य नागरिकास भोगावे लागतात. महापालिका किंवा एमएमआरडीए ने अजिबात काम केलेलं नाही असंही नाही. पण दोघांना मिळणारा निधी पाहिला तर एव्हाना मुंबईचं शांघाय व्हायला हरकत नव्हती, हे शेंबड पोर देखील सांगेल. मग नेमका विकास का नाही झाला? कालपर्यंत चाळीत राहणारा (कोणत्याही पक्षाचा) कार्यकर्ता नगरसेवक झाला की पाच वर्षात त्याच्या बुडाखाली फॉर्च्युनर येते नी तो चाळीतून किमान २-३-४ बीएचके च्या घरात शिफ्ट होतो. रस्ते विभागात चिकटलेला नुकतंच मिसरुट फुटलेला अभियंता दोन किमी रस्ता बांधला की चार चाकीतून उडायला लागतो. वरच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत तर न बोललेलं बरं. मालिशकाने नेमकं "त्या" गाण्यातून वर्मावर बोट ठेवलं तर साऱ्यांची पंचायत झाली. परवा एका नगरसेविकेने सांगितलं की हे गाणं म्हणजे तमाम मुंबई आणि मराठी माणसाचा अपमान आहे. कसं काय बुवा? खड्ड्यात आयुष्य गेलेल्या मुंबईकराला कधी टेबलाखालच्या पाकिटाचा वास तरी दिलात का? अंगावर आलं की मराठी माणसाची ढाल पुढे करणार का? त्यापेक्षा "येत्या मोसमात माझ्या प्रभागात कुठेही पाणी भरणार नाही अशी व्यवस्था निर्माण करेन" अशी शपथ घेतली असती तर मतदारांचं भलं नसतं का झालं? हद्द म्हणजे त्या गाण्यासाठी म्हणे मालिशकावर ५०० कोटींचा अब्रूनुकसानभरपाईचा दावा ठोकणार. कोणाची अब्रू? आणि कुठे असते ती? भरा खटला, जिंका आणि ते पैसे तरी कारणी लावा. अजून काय बोलणार! -- हतबल माजी नागरिक - बृमुंमपा

व्यक्तिस्वातंत्र्याचा पान्हा

श्रीमान निखिल वागळेजी कृत #सडेतोड चा वग अचानक बंद केल्याबद्दल समाज माध्यमात जो पान्हा फुटलाय तो आश्चर्यकारक अजिबात नाही. निर्भीड, निष्पक्ष वगैरे विशेषणं लावून जे महिमामंडन चालू आहे ते सुद्धा अनपेक्षित नाही. ही विशेषणं खरंच लागू होतात का ते तपासणं इथं गरजेचं नाही. कारण डाव्या विचारसरणीचा शिक्का असला की वरील गोष्टी आपोआप लागू होतात. वागळे साहेबानी २०१४ ला बहुतेक आजच्याच दिवशी आयबीएन लोकमतला रामराम ठोकला होता. कारण होतं रिलायन्सने विकत घेतलेला नेटवर्क १८ चा स्टेक. रिलायन्स भांडवलशाहीचं प्रतीक असल्याने त्यांचा पैसा अर्थातच हराम, अशी साधारण मांडणी. त्यातून आपल्याला भांडवलंदारांविरोधात लिहिता - बोलता येणार नाही असा कांगावा. अगोदरचे मालक श्री दर्डा हे कोण होते? त्यांचा सर्व पैसा हलाल होता का? त्यांचा कोळसा घोटाळ्यात सहभाग नव्हता का? असे प्रश्न विचारायचे नसतात. तो अधिकार डाव्यांना सोडून कोणालाही नाही. दर्डा परिवाराच्या कोळसा घोटाळ्यातील सहभागाविषयी किती निःपक्षपाती रिपोर्टिंग वागळे साहेबांनी केलं हे आपण जाणतोच. बरं भांडवलदार रिलायन्स स्पॉन्सर्ड आयबीएन सोडल्यावर पुढची चॉईस काय? .... मी मराठी. याचे मालक कोण? ... लाखो सामान्य गोरगरिबांचे पैसे धक्क्याला लावून अल्पावधीत रोडपती ते करोडपती असा प्रवास केलेले श्री महेश मोतेवार साहेब. सध्या ते जेलची हवा खात आहेत. पण ते असो. वागळे साहेबांना थोडीच माहीत होतं की मोतेवार चोर आहेत म्हणून? बरं तिथलं रिपोर्टिंग किती केलं हा प्रश्न सुदधा आपण विचारायचा नाही. पुढची चॉईस नीट आठवत नाही. बहुतेक महाराष्ट्र-१ (correct me if wrong) तिथेही सत्यनारायनाने घोळ घातला आणि मग पुढचं स्टेशन बहुतेक टीव्ही-९. एवढा प्रचंड करिअर ग्राफ बघून भल्याभल्यांना भोवळ येईल. वागळे साहेब कमालीचे निर्भीड आहेत यात अजिबात शंका नाही. महानगर ते टीव्ही-९ या प्रवासात ते अनेकदा दिसून आलंय. पण या सद्गुणाला कांगावाखोर आणि अहंपणाची जोड मिळाल्याने पत्रकार म्हणून सगळंच मुसळ केरात गेलंय असं वाटतं. हे कमी की काय म्हणून प्रचंड हिंदुद्वेष, विशेषतः ब्राह्मणद्वेष ठासून भरल्यामुळे निष्पक्ष वगैरे विशेषणाची लाज निघते हे निवाभक्तांना कळत नाही. निखिल वागळेजी एक पत्रकार म्हणून आवडत नसले तरी टीव्ही-९ ने त्यांच्याबाबत केलेला प्रकार अजिबात समर्थनीय नाही. पण भांडवलदारांच्या पैशावर चालणाऱ्या माध्यमांकडून आपण अजून काय अपेक्षा करणार? उद्या वागळे साहेबांनी द्वेषमूलक प्रचारकी थाट कमी करून ऑब्जेक्टिव्ह पत्रकारिता केली तर कुंपणावरून थोडे उजवीकडे सरकलेले कित्येकजण त्याचे पंखे होतील ... मी सुद्धा. 😊😊😊 तूर्तास वागळे साहेब मराठी माध्यमांना पुन्हा एकदा सोन्याचे दिवस दाखवतील अशी आशा करूया. ©शैलेंद्र दिंडे २१/०७/२०१७

मोहन ...

"मोहन . . . . " नेहमीप्रमाणे खाली मान घालून ऑफिस च्या गेटमध्ये घुसत असतानाच त्याच्या कानावर हाक आली. आवाजही ओळखीचाच होता, म्हणून त्याने मागे वळून पाहिलं. हो, ती आशु होती. दहा बारा वर्षांपूर्वी तो ज्या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहात होता, त्या घर मालकाची एकुलती एक लेक. दिसायला तशी सावळीच, पण नाकी डोळी नीटस, उंचीपुरी आणि कमालीच्या आत्मविश्वासाने भरलेली. खरतर आत्मविश्वास हेच तीच सौंदर्य होत. जन्मताच आईची साथ सुटलेली. त्यामुळे सावत्र आईच्या हाताखाली राबता राबता उर्वरित वेळात अभ्यास करून शिकावं, मोठ्ठ व्हावं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. म्हणतात ना 'संकट त्याच्याच वाट्याला येतात त्याच्यात ती झेलायची क्षमता असते', काहीस असंच तिचं आयुष्य होतं. बी कॉम च्या शेवटच्या वर्षाला असतानाच किरकोळ तापाचं निमित्त झालं आणि वडील गेले. सावत्र आई आणि दोन सावत्र भावंडांची जबाबदारी तिच्यावर पडली . . . खरतर तसं नातेवाईकांनीच तिच्या गळी उतरवलं. तिनेही न डगमगता ती जबाबदारी स्वीकारली, मात्र एका अटीवर - शिक्षण अर्धवट न सोडण्याच्या. एका छोट्याश्या घटनेने तीच आयुष्य आमूलाग्र बदललं. वडील गेल्यानंतर सावत्र आईने अंथरून धरलं. दोन भावंडं अनुक्रमे १० आणि १३ वर्षांची, पण जबाबदारी आणि परिस्थितीची कोणतीही जाणीव नसलेली. त्यामुळे रोज सकाळी चारच्या ठोक्याला तिचा दिवस सुरू व्हायचा. आंघोळपाणी उरकायचं, तिघांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, स्वतःसाठी डबा घायचा आणि सहा वाजता कॉलेजला जाण्यासाठी घर सोडायचं. दुपारी दोन ला घरी यायचं. भांडी - कुंडी, धुणी उरकायची, मग सहा पर्यंत स्वतःचा अभ्यास आणि पुन्हा स्वयंपाक करता करता १० - १५ पोरांची शिकवणी घ्यायची. सगळं उरकता उरकता झोपायला रोजचे ११ वाजायचे. या सगळ्या धबडग्यात तीच स्वतःकडे अक्षम्य दुर्लक्ष व्हायला लागलं. परिणाम चेहऱ्यावर दिसायला लागले. एका बाजूला वय वाढत चालल्याची जाणीव आणि दुसरीकडे जबाबदारीचं ओझं; पुरती पिचून गेली होती बिचारी. मोहन नुकताच एका बड्या उद्योगसमूहात बड्या हुद्यावर रुजू झाला होता. आशूच्या धडपडीचं त्याला मोठ्ठ कौतुक वाटायचं. पण दोघांच्याही व्यस्त वेळापत्रकामुळे कधी फारसं बोलणं - भेटणं व्हायचं नाही. चुकून एखाद्या रविवारी संध्याकाळी थोडी संधी मिळाली की ती न चुकता त्याच्या घरात जायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या. हळूहळू मैत्री घट्ट होत गेली. मोहन वेळप्रसंगी तिला मदतीचा हात द्यायचा. ती ही न चुकता वेळेत परत फेड करायची. आशु मोहनच्या दिलदारपणामुळे त्याच्याकडे आकृष्ठ होत होती. तो मात्र तिच्याकडे फक्त एक रोल मॉडेल आणि चांगली मैत्रीण म्हणून पाहायचा. दरम्यान तिने बी कॉम पूर्ण केलं आणि एका सी. ए. च्या कार्यालयात ती नोकरी करू लागली. काही दिवसानंतर तिच्या त्याच्याविषयीच्या भावना त्याला लक्षात यायला लागल्या. तसा तो सावध झाला. तो स्वतः कठीण परिस्थितीतून वर आला होता. "आंतरजातीय" वगैरे लफड्यात पडून कुटुंबाची विनाकारण वाताहत होईल ही भीती कायम त्याच्या मनात होती. थोड्याच दिवसात मोहनने स्वतःचं घर खरेदी केलं आणि त्यानं आशुचा निरोप घेतला. त्यापासून १२ वर्षात एखाद दुसरा प्रसंग वगळता त्याला कधीही आशूची आठवण झाली नाही, तसं काही कारणही नव्हतं आठवण होण्याचं. आज तिला असं अचानक पाहून क्षणार्धात सर्व पट त्याच्या डोळ्यासमोर आला. एकमेकांना एवढ्या वर्षांनी भेटून दोघांनाही अतिशय आनंद झाला. थोडीफार इकडची तिकडची चौकशी झाली. मात्र वेळेअभावी दोघांना फार वेळ बोलता आलं नाही. मग एकमेकांच्या नंबरची देवाणघेवाण झाली आणि दोघीनींही निरोप घेतला. दिवसभराचं काम संपवून मोहन घरी पोहोचला होता. रात्री अकराच्या आसपास त्याचा मोबाईल खणखणला. अर्थातच, आशुचा फोन होता. थोड्याफार गप्पा झाल्या आणि मग तिने थेट दुसऱ्या दिवशी तिच्या नवीन घरी भेटण्याचं त्याला आमंत्रण दिलं. आमंत्रण कसलं . . . आगह केला. उरात थोडीफार धाकधूक होती, तरीही मोहन तयार झाला. सकाळी निघतानाच त्याने बायकोला रात्री यायला उशीर होईल असं सांगून ठेवलं. ठरल्याप्रमाणे तो संध्याकाळी सात वाजता आशूच्या घरी पोहोचला. ती एकटीच होती. चहा नाश्ता होता होता गप्पा रंगल्या. दरम्यान ती अजूनही अविवाहित असल्याचं त्याला समजलं. . . . अर्थातच त्याच्या प्रतीक्षेत. तिची आई देवाघरी पोहोचली होती आणि दोन्ही भाऊ कुठल्याशा गुन्ह्यात जेलमध्ये. तिच्या वाट्याला उरलं होतं फक्त एकाकी जीवन. मोहनच्या पुन्हा भेटण्याने आशूच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. वाढत्या वयाबरोबरच तिला आधाराची गरज वाटू लागली होती. एकट्या बाईच्या नशिबी जेवढे भोग येतात ते भोगल्यामुळे तिचा कोणाही पुरुषावर विश्वास उरला नव्हता . . . अपवाद होता मोहनचा. पण मोहन स्वतः विवाहित आणि एका लेकराचं बाप होता. त्यामुळे स्वतःच्या सुखासाठी त्याच्या संसारात विष कालवण्याएवढी ती निष्ठुर किंवा मतलबी नव्हती. पण तिच्या डोक्यात एक वेगळाच विचार मोहन भेटल्यापासून सुरू झाला होता. तिला आता थांबायचं नव्हतं. "मोहन, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय." थोडं गंभीर होत आशु म्हणाली. "बोल ना." थोडं सावध होत तो बोलला. "गैरसमज करून घेऊ नकोस. पण मला जे वाटतंय ते तुझ्याशिवाय मी कोणाला सांगू?" "बोल ग, अगदी बिनधास्त बोल." क्षणाचाही विलंब न करता ती उद्गारली, "मला जगण्यासाठी आधार देशील?" तीच वाक्य ऐकून तो हादरलाच होता. पण तरीही स्वतःला सावरत तो म्हणाला, "म्हणजे?" "एक मूल टाकशील माझ्या पदरात?" कानात कोणीतरी गरम शिसं ओतल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. क्षणार्धात त्याच्या डोळ्यासमोरून जीव ओवाळून टाकणारी पत्नी आणि निष्पाप मुलाचा चेहरा तरळून गेला. काहीही बोलायला त्याला शब्द सुचत नव्हते. त्याला तिचा राग आला नव्हता. पण तिच्या असहाय्य्यतेची दया मात्र येत होती. हतबल होऊन तो सोफ्यावरून उठला आणि दरवाजा उघडून तडक घरी गेला. आशु मात्र शून्यात नजर लावून तिथेच बराच वेळ बसून राहिली. आज मोहनचं कशातही लक्ष लागत नव्हतं. बाहेर जेवून आल्याचं निमित्त सांगून तो सरळ झोपायला गेला. मात्र उशिरापर्यंत त्याचा डोळ्याला डोळा लागला नाही. विचार करून करून मेंदू थकला आणि मग पहाटे कधीतरी तो झोपी गेला. सकाळी आठला त्याच्या बायकोने त्याला हलवून जागा केला आणि हातात बेड टी चा कप देऊन ती निघून गेली. चहाचा घोट घेत घेत त्याने रिमोटने टी.व्ही. चालू करून आपला फेव्हरेट न्यूज चॅनेल ट्यून केला. टी.व्ही. च्या पडद्यावर ब्रेकिंग न्यूज ची पट्टी झळकत होती --- "आश्लेषा सोनावणे नावाच्या महिलेचा तारांगण इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू!" मोहनच्या पायाखालची जमीनच सरकली होती. चहाच्या कपासहित तो तिथेच थिजून गेला. @शैलेंद्र दिंडे. २३/०७/२०१६