Monday, July 31, 2017
व्यक्तिस्वातंत्र्याचा पान्हा
श्रीमान निखिल वागळेजी कृत #सडेतोड चा वग अचानक बंद केल्याबद्दल समाज माध्यमात जो पान्हा फुटलाय तो आश्चर्यकारक अजिबात नाही. निर्भीड, निष्पक्ष वगैरे विशेषणं लावून जे महिमामंडन चालू आहे ते सुद्धा अनपेक्षित नाही. ही विशेषणं खरंच लागू होतात का ते तपासणं इथं गरजेचं नाही. कारण डाव्या विचारसरणीचा शिक्का असला की वरील गोष्टी आपोआप लागू होतात.
वागळे साहेबानी २०१४ ला बहुतेक आजच्याच दिवशी आयबीएन लोकमतला रामराम ठोकला होता. कारण होतं रिलायन्सने विकत घेतलेला नेटवर्क १८ चा स्टेक. रिलायन्स भांडवलशाहीचं प्रतीक असल्याने त्यांचा पैसा अर्थातच हराम, अशी साधारण मांडणी. त्यातून आपल्याला भांडवलंदारांविरोधात लिहिता - बोलता येणार नाही असा कांगावा. अगोदरचे मालक श्री दर्डा हे कोण होते? त्यांचा सर्व पैसा हलाल होता का? त्यांचा कोळसा घोटाळ्यात सहभाग नव्हता का? असे प्रश्न विचारायचे नसतात. तो अधिकार डाव्यांना सोडून कोणालाही नाही. दर्डा परिवाराच्या कोळसा घोटाळ्यातील सहभागाविषयी किती निःपक्षपाती रिपोर्टिंग वागळे साहेबांनी केलं हे आपण जाणतोच.
बरं भांडवलदार रिलायन्स स्पॉन्सर्ड आयबीएन सोडल्यावर पुढची चॉईस काय? .... मी मराठी. याचे मालक कोण? ... लाखो सामान्य गोरगरिबांचे पैसे धक्क्याला लावून अल्पावधीत रोडपती ते करोडपती असा प्रवास केलेले श्री महेश मोतेवार साहेब. सध्या ते जेलची हवा खात आहेत. पण ते असो. वागळे साहेबांना थोडीच माहीत होतं की मोतेवार चोर आहेत म्हणून? बरं तिथलं रिपोर्टिंग किती केलं हा प्रश्न सुदधा आपण विचारायचा नाही.
पुढची चॉईस नीट आठवत नाही. बहुतेक महाराष्ट्र-१ (correct me if wrong) तिथेही सत्यनारायनाने घोळ घातला आणि मग पुढचं स्टेशन बहुतेक टीव्ही-९. एवढा प्रचंड करिअर ग्राफ बघून भल्याभल्यांना भोवळ येईल.
वागळे साहेब कमालीचे निर्भीड आहेत यात अजिबात शंका नाही. महानगर ते टीव्ही-९ या प्रवासात ते अनेकदा दिसून आलंय. पण या सद्गुणाला कांगावाखोर आणि अहंपणाची जोड मिळाल्याने पत्रकार म्हणून सगळंच मुसळ केरात गेलंय असं वाटतं. हे कमी की काय म्हणून प्रचंड हिंदुद्वेष, विशेषतः ब्राह्मणद्वेष ठासून भरल्यामुळे निष्पक्ष वगैरे विशेषणाची लाज निघते हे निवाभक्तांना कळत नाही.
निखिल वागळेजी एक पत्रकार म्हणून आवडत नसले तरी टीव्ही-९ ने त्यांच्याबाबत केलेला प्रकार अजिबात समर्थनीय नाही. पण भांडवलदारांच्या पैशावर चालणाऱ्या माध्यमांकडून आपण अजून काय अपेक्षा करणार? उद्या वागळे साहेबांनी द्वेषमूलक प्रचारकी थाट कमी करून ऑब्जेक्टिव्ह पत्रकारिता केली तर कुंपणावरून थोडे उजवीकडे सरकलेले कित्येकजण त्याचे पंखे होतील ... मी सुद्धा. 😊😊😊
तूर्तास वागळे साहेब मराठी माध्यमांना पुन्हा एकदा सोन्याचे दिवस दाखवतील अशी आशा करूया.
©शैलेंद्र दिंडे
२१/०७/२०१७
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment