Monday, July 31, 2017
उनाड बालपण
सहल घेउन जाणे आणि ती ही हायस्कूलची म्हणजे एक दिव्यच.
त्यात कार्टी गावातली असतील तर मास्तरांच काय खर नसतय. पोरांची निघते ती सहल आणि मास्तरांची निघते ती धिंड अशी अवस्था. आयुष्यभर डाम्बुन ठेवलेली जनावरं कासरा ढीला सोडल्यावर उधळतात आणि मग गुराख्याची जी तर्हा होते तीच काहीशी मास्तर लोकांची व्ह्ययची.
महाबलेश्वरच्या आर्थर सिट की कोणत्यातरी पॉइंटपाशी आमची वरात थांबली होती. सगळी पोरं पोरी रेलिंगवर वाकून वाकून दरीची खोली मोजत होती. काहीजन जुने पाच दहा पैसे दरीत टाकुन वर यायची वाट पहात होते. दुसरीकडे आमचा सहा सात अतिशशहान्यांचा कळप एकमेव क्यामेर्यातून भन्नाट पोझ देऊन फोटो काढण्यात व्यस्त होता. माझा नंबर शेवटी लागला. मास्तरांची नजर चुकवून मी दरीकाठच्या एका झाडावर चढलो. उडी मारताना फोटो क्लिक करायचा असा प्लान होता.
तेवढ्यात माझ्या प्रिय दुश्मनाने गणिता च्या जाधव मास्तरच्या कानात गुदगुल्या केल्या, "सर तिकड बघा. तुमचा लाडका विद्यार्थी कुठ चढलाय."
झालं, सकाळपासून मेंढ़र हाकून वैतागलेल्या सरांनी मग माझ्यावर शाब्दिक हल्ला चढवला, (आवडता इध्यार्थी असल्यामुळे जराशी सुट) "गापट्या हिकड़ नको तिकड दरीत उडी मार. तुझ्यामागुन मी पण येतो. मंजी तू पण सुटशिल आणि मी बी"
उर्वरित सहल मात्र मी जाधव सरा पासून बचावासाठी वाया घालवली.
13/01/2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment