Monday, July 31, 2017
आमचा आंदु
आमच्या माळेवाडीची प्राथमिक शाळा नीनु शेठच्या माडीवर भरायची. बालवाडी ते चौथी यत्ता एकाच लांबलचक घरात, मध्ये फक्त कपाटांच पार्टिशन. दोनच गुर्जी . . . दिवसभर पोरांना हाकून हाकून पार दमून जायचे. पण कामावर निष्ठा जबरदस्त.
सगळ्या कविता, पाढे सगळ्यांना तोंडपाठ असायलाच हवेत हा जणू अलिखित नियमच. त्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त घोकंपट्टी एके घोकंपट्टी. त्यात आवाजात कसलीही तडजोड नाही चालायची. अगदी कोकरूड फाटा तो शिवची वस्ती आणि वर तामजयच्या टेकापर्यन्त आवाज गेलाच पाहिजे अशी तंबीच दिलेली असायची.
आवाज कमी झालाच तर "सुक्काळीच्या, वारणेत दुष्काळ पडलाय का रे?" अशा शेलक्या भाषेत टोमके गुर्जी सुनवायचे. एवढ्याने काम झाल तर ठीक नाहीतर टेबलावर वेताची काठी ठेवलेलीच असायची आमच्या सेवेसाठी. पण काही झाल तरी आमच्या कोणाच्याही बापाची हिम्मत नव्हती गुर्जींना जाब विचारायची.
ह्या सगळ्या कष्टाचं चीज व्हायचं ते शाळा तपासणीच्या वेळी. शिराळ्याला तेव्हा बी. डी. हुलवान नावाचे गटशिक्षण अधिकारी होते. सहा फुट उंच, सडपातळ शरीरयष्टी पण करारी चेहरा. भल्या भल्यांची त्रेधातिर्पिट उडायची त्यांच्यासमोर.
अशाच एका तपासणीवेळचा प्रसंग.
नेहमीप्रमाणे सकाळी १० ला येणारे साहेब दुपारी ३ वाजता आले. माडीचा जिना चढून वर येताच आम्ही "एक साथ नमस्ते" चा घोष करून सायबांच स्वागत केल. येताच त्यांनी शाळेची काय बाय रजिस्टर चेक केली आणि ते आमच्याकडे वळले. इथ आमची कमी पण गुर्जींचीच कसोटी असायची. पण वर्षभर घेतलेल्या मेहनतीमुळे गुर्जी तसे निश्चित असायचे.
सायबांनी एकेक पोराला उभ करून कोणाला पाढे, कोणाला अजून काही प्रश्न विचारले. खणखणीत उत्तर ऐकून जरा खुशीतच त्यांनी एखादी कविता म्हणून दाखवा अशी फरमाईश केली. कधी नव्हे तो आमचा आन्दु मागून केकाटला, "सायब, मी म्हणू?"
आतापर्यंत सगळ नीट चाललं होत. पण आन्दुच्या आगावूपनामुळे गुर्जींच्या काळजाचा ठोका चुकला. राग आणि भीतीमिश्रित हास्य करून गुर्जींनी 'इर्शाद" म्हटलं आणि आन्दु गाऊ लागला.
फुलपाखरू!
छान किती दिसते । फुलपाखरू
.
.
कस बस पुढच एक कडव गायला आणि वाघान ट्र्याक बदलला . . .
.
.
कुण्या गावाचं आल पाखरू,
बसलंय डौलात, खुदकन हसतंय गालात ।
मैदान मारल्याच्या थाटात आन्दु क्रमाक्रमाने सायबाकडे आणि गुर्जींकडे पाहत होता. इकडे सायबाच्या भीतीने दाबून ठेवलेल्या हास्याचा स्फोट झाला आणि सगळी कार्टी घोड्यासारखी खिदळायला लागली. सायबाच्या करारी चेहऱ्यावरपण गब्बरसदृश्य हास्याची लकेर उमटली. ते बघून आमच्या दोन्ही गुर्जींची अवस्था मात्र गब्बरच्या समोर उभ्या असलेल्या शोलेतल्या "त्या" तिघांसारखी झाली होती.
@शैलेंद्र दिंडे.
24/09/2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment