Monday, July 31, 2017

सोळावं वरीस नोकरीचं

आज माझ्या नोकरीची १६ वर्ष पूर्ण होतायत. काय काय झालं या १६ वर्षात …! खिशात ८०० रुपये, एक वस्त्र ***वर अन दुसरं दांडीवर अशा अवस्थेत मुंबईत आलो . . . जगण्याचा मार्ग शोधण्यासाठी. स्वप्न वगैरे खूप मोठे शब्द होते माझ्यासाठी त्यावेळी. घाटकोपरला चुलत काकांकडे खाण्यापिण्याची, राहण्याची सोय होती. हातात विद्युत अभियांत्रिकीची पदविका, डोळ्यासमोर गावी माझ्या शिक्षणासाठी गहाण पडलेली शेती आणि मीच काहीतरी भलं करू शकेन या आशेने कपाळाच्या खोबणीत खोलवर डोळे गेलेले आई वडील आणि भाऊ; एवढाच काय तो नजारा सतत तरळत असायचा. आल्या आल्या डझनभर कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केले. उत्तर येण्याची आशा तशी धूसरच. माझे अजून एक चुलत काका तत्कालीन बी. एस. इ. एस. कंपनीमध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. त्यांच्याच सल्याने आणि ओळखीने मी बी. एस. इ. एस. मधील मुख्य अभियंता श्री एस के पटेल साहेबाना सर्व कागदपत्रे घेऊन भेटलो. ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही मिळालेले उत्तम मार्क्स आणि कागदपत्रांच सादरीकरण पाहून साहेब खुश झाले. त्यांनी तत्काळ मला मानव संसाधन विभागाच्या तिवारी साहेबांना भेटायला सांगितलं. एवढंच नाही तर अर्जावर लेखी परीक्षा व मुलाखतीला बोलावाण्यासंबंधी शेराही मारला. अर्ज जमा केला. साधारण आठवड्याभराने लेखी परीक्षा आणि मुलाखत होणार होती. घरी येउन निश्चिंत झालो. तीन एक दिवसांनी रात्री १०:३० च्या आसपास आम्ही सर्व जेऊन टी. व्ही. पाहत बसलो होतो. डोर-बेल वाजली म्हणून काकांनी उठून दरवाजा उघडला. कोणीतरी अनोळखी व्यक्ती हातात एक पाकीट घेऊन "शैलेंद्र दिंडे नावाचं कुणी इथं राहत का?" अशी चौकशी करत होता. काकांनी होकारार्थी उतर देताच त्याने ते पाकीट काकांच्या हातात सोपवलं आणि म्हणाला, "हे पाकीट चुकून इंदिरा नगरच्या माझ्या पत्यावर आलं होतं. आत बी एस इ एस च कॉल लेटर आहे म्हणून घेऊन आलो." मी उठून त्याला पाहायला आणि आभार मानायला जाणार त्याअगोदर तो बाजूच्या बोळातून गायब ही झाला. मनाला एक चुटपूट लागून राहिली . . . कायमची! दोन तीन दिवसांनी लेखी परीक्षा, मुलाखत वगैरे सर्व व्यवस्थित पार पडलं. नेमणुकीच पत्र हातात पडलं. १२ ओगस्ट १९९८ . . . . नोकरीचा पहिला दिवस ते आजपर्यंत मी "त्या" देवदूताला शोधतोय. का . . . ? मुंबईतलं पहिलं पाऊल ते आत्तापर्यंत . . . परत मिळवलेली जमीन, स्वत:च घर, चारचाकी, अजून बरच काही आणि अगदी महत्वाचं म्हणजे आई वडिलांच्या, भावाच्या, नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद-अभिमान; जर त्या देवदुताने "ते" पाकीट माझ्याकडे न पोहोचवता कचऱ्याच्या डब्यात फेकलं असतं तर हे सगळं शक्य झालं असत का? या जगात कोणीही स्वयंभू नाही. आयुष्याच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना बर्याच लोकांची प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे मदत होत असते. त्यांच्याबद्दल सदैव ऋणी राहायला हवं. म्हणूनच मला शून्यातून वर येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. 11/08/2014

No comments:

Post a Comment