Monday, July 31, 2017
अभ्यासिकेतले किडे
आजच्या (किमान) पुस्तक दिनी (तरी) प्रांजळ कबुली द्यावी म्हणतो. 😍🤓😜
दहावीला असताना आमचे तेव्हाचे कर्मनिष्ठ शिक्षक शाळा सुटल्यानंतर आम्हा सर्वांसाठी अभ्यासिका चालवायचे ... अर्थात मोफत .... जेणेकरून गोरगरीब आणि ज्यांच्या घरी वीज वगैरे नाही अशांची अभ्यासाची सोय व्हावी.
आमचा सात आठ जणांचा ग्रुप तसा अगोदरच बुद्धिमान आणि मल्टीटास्किंग वगैरे होता. समज आणि शिंगं जरा लवकरच फुटली होती समजा.
तर दहावीत असलो तरी थोडं ऍडव्हान्स नॉलेज 😷 मिळावं म्हणून आम्ही एक सर्क्युलेटिंग लायब्ररी चालू होती. ज्यांना घरात प्रायव्हसी मिळायची ते हा उच्च पातळीवरचा अभ्यास घरी करायचे आणि बाकीचे रात्रीच्या अभ्यासिकेत "एकवीस अपेक्षित" च्या आत तो ग्रंथ घालून मागच्या बाकावर बसून उपासना करायचे.
उच्च शिक्षणाची आवड एवढी जबरदस्त की एकेदिवशी दोन विद्यार्थ्यांच्यात पहिले मैं पहिले मैं करत बा-चा-बा-ची झाली. गणिताच्या जाधव सरांनी दोघांना रंगेहात पकडलं. दोन सनकन कानाखाली पडल्यावर अख्या डायरेक्टर बॉडीची नावं त्यांनी पोपटासारखी सांगितली.
सकाळची सामुदायिक प्रार्थना झाल्यावर उत्तरपूजेसाठी मला आणि आमच्या मुखीयाला बोलावनं आलं. अर्थात आमचा मुखीया एका शिक्षकाचा भाचा आणि मी शाळेतला बऱ्यापैकी बरा विद्यार्थी असल्याने फक्त समज देऊन आमची सुटका झाली आणि आम्ही कानाला खडा लावला.
पुढे दहावीच्या निकालानंतर शाळेच्या कार्यालयातल्या "गुणवंत विद्यार्थी" यादीत माझं नांव झळकलं आणि जाधव सरांनी दाखवलेल्या विश्वासाचं फळ मिळालं.
सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!!!
शैलेंद्र दिंडे
२३/०४/२०१७
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment