Monday, July 31, 2017
मराठ्यांनो ... उघडा डोळे, पहा नीट!
आमच्या मराठा समाजाची वाट आमच्याच दादा - काका - भाऊ - बंटी - घंटी आणि तायड्यांनी खादी लेवून लावली आहे. पण आमच्या पोरांना ते कळत नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर खण - दीड खण घरात पुन्हा भिंती उभ्या राहतात. भाऊ भावाचा वैरी होतो. जमिनीचे तुकडे पडतात. तेच तुकडे मग बडेजाव करण्याच्या नादात पुढाऱ्यांच्या घशात जातात.
९८ साली कॉलेज संपताच मला माझ्या एका काकांनी निरोप दिला होता, "उद्या आपल्याला कारखाण्यावर जायचंय, आपलं काम हुतंय तिथं." मी तेव्हा स्पष्ट नकार दिला होता. तोच माझ्या पत्त्यावर पडला. नाहीतर नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्यातच जिंदगी खर्ची पडली असती.
कालपर्यंत तंबाखूचे वांदे असलेला दादा - काका - भाऊ - बंटी - घंटी पाचेक वर्षात एसयुव्ही मधून फिरायला लागतो. गळ्यातला जोतिबा - नाईकबाचा काळा धागा जाऊन त्याजागी सोन्याचा गोफ लटकायला लागतो. दावणीची हाडकुळी बैलं जाऊन शर्यतीच्या बैलांचा शौक सुरु होतो. एखादं दुसरा पोकलेन किंवा गेला बाजार जेसीबी अंगणात झुलायला लागतो. सोन्याच्या झगमगाटाने वैनींचा मूळचा सावळा रंग बदलून त्यांची पिवळी जर्द धामिण बनते. . .. ...
. . . . . . आणि त्यांची थोरवी (?) गाताना आमच्या गण्या - शिरप्याच्या तोंडातला तीळही ओला होत नाही. एक क्षणही आमच्या गण्या - शिरप्याला दादा - काका - भाऊ - बंटी - घंटी च्या यशाचं गुपित जाणून घ्यायची अक्कल येत नाही. दादा - काका - भाऊ - बंटी - घंटी च्या मागं मागं फिरलं कि यांच्या चहा - पाण्याची आणि रात्रीच्या पेयपानाची व्यवस्था होते. एकदा धुंदी चढली की मग मागच्यांचा विचार करायची गरजच उरत नाही.
दिवसेंदिवस वाटण्यांमुळे कमी होत जाणारं पिकाऊ क्षेत्र, शिकायला जावं तर वारेमाप फी आणि शिकलं तरी नोकरीची बोंबाबोंब यामुळे मराठा समाज भयंकर कात्रीत सापडलाय. आजकालच्या मोर्च्यांमध्ये याची झलक पाहायला मिळतेय. पण याही परिस्थितीत गर्दीचा फायदा उठवण्यासाठी राजकीय श्वापदं जीवाचं रान करतायत.
यातूनच मग ऍट्रॉसिटीचं बुजगावणं उभं केलं जातंय. या कायद्याचा गैरफायदा घेतला जातोय हे १००% खरं आहे. पण हा सामान्य मराठा युवकाचा प्रश्न कसा काय असू शकतो? आजपर्यंत आपल्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी दोन्ही समाजात झुंजी लावणारे नेते कधी या कायद्याखाली "आत" नाही गेले. "आत" गेले ते सामान्य मराठा युवक. जर आम्ही आमची अक्कल नीट वापरली तर १८शिट्टी ला घाबरायची गरज काय?
गण्या - शिरप्या हो . . . उघड डोळे अन पहा नीट.
नाहीतर पुढची पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही.
@शैलेंद्र दिंडे
१०.०९.२०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment