Monday, July 31, 2017
बादरे साहेब
बादरे साहेब . . .
साधारणपणे मी तिसरीत असेन. आमच्या कोकरूड पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक म्हणून बादरे साहेब रुजू झाले होते. त्याचं मूळ गाव कुठेतरी सांगोल्याच्या जवळपास होत. ते महिना ३० रुपये भाड्याने आमच्या घरी रहात होते.
आमच घर एकदम रस्त्यालगत. दिसायला तसं खूप मोठ्ठ आणि राजेशाही. पण म्हणतात ना "बडा घर आणि पोकळ वासे" अशीच काहीशी अवस्था होती.
माझे आजोबा ठाणे बेलापूर रोडच्या तत्कालीन "Standard Alkali" कंपनीतले मोठे लेबर कंत्राटदार. त्यांनी मुंबई सोडली आणि सगळ चित्र बदलल. माझ्या वडिलांनी नोकरी न करण्याच्या हट्टापाई बरेच धंदे केले आणि खड्ड्यात घातले. ते खड्डे भरता भरता आजोबांची उरली सुरली कमाई तर संपलीच, वरून शेतीही गहाण पडली.
त्यामुळे स्वत:ची उरली सुरली जमीन कसता कसता आणि अल्प उत्पन्न असल्यामुळे इतरत्र मोल मजुरी करण्याची वेळ आई-वडिलांवर आली. अर्थात वडिलांची यशस्वी (?) वाटचाल पाहता घराच सर्व व्यवस्थापन आपसूकच आईकडे हस्तांतरित झाल होत. अशा परिस्थितीत मला पैशाच दर्शन होणं दुर्लभच.
एकवेळ शाळेत एकाकडे मी कॅमेल ची कंपास पेटी पहिली आणि ती माझ्या पक्की डोक्यात घुसली. पण ती घेण्यासाठी घरातून पैसे मिळवण अशक्य होत. दरम्यान माझी आई खर्चातून उरलेले पैसे एखाद्या कडधान्याच्या वगैरे डब्यात ठेवताना मी बर्याचदा पाहिलेलं होत.
असंच एकदा महिन्याच्या सुरुवातीला आमचे भाडेकरू बादरे साहेबांनी घरभाड्याचे ३० रुपये सकाळी सकाळी आईकडे दिले. तिने ते सवईने एका डब्यात ठेवले. मी चहा पीत पीत कान्या डोळ्याने ते बघितलं आणि प्लान मनात पक्का केला.
शनिवारी सकाळची शाळा असायची. मी ११ वाजता घरी आलो. आईवडील आणि आजोबा शेतात गेले होते. संधी साधून मी ते पैसे उडवले आणि तडक गावातल्या स्टेशनरीत गेलो. माझ्यासाठी माझ्या स्वप्नातली कंपास पेटी आणि लहान भावासाठी कायबाय वस्तू खरेदी करून घरी आलो. भावासाठी आणलेल्या वस्तू त्याला देऊन टाकल्या आणि निवांत झालो.
शेवटी जे व्हायचं तेच झाल. संध्याकाळच्या वेळी आईवडील शेतातून परतताच भावाने त्याला दिलेल्या वस्तू नाचवतच त्याचं स्वागत केल. वस्तू कोणी दिल्या, कुठून आणल्या विचारताच त्याने माझ्याकडे बोट दाखवलं. आता माझ काही खर नाही हे कळून चुकल होत. माझ्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु होता. सर्व अस्त्र वापरून झाली पण मी काही दाद देत नव्हतो. आईचे मात्र रडून रडून डोळे सुजले होते. आख्खी रात्र तिने जागूनच काढली.
सकाळी नेहमीप्रमाणे बादरे साहेब चहासाठी आले. तेव्हा त्यांना माझा पराक्रम समजला. मला झोपेतून उठवून त्यांच्या कोर्टात उभ करण्यात आल. पोलिसी खाक्या दाखवताच मी पोपटासारखा कबुल झालो. तेव्हा त्यांनी माझी नेमकी कशी "शाळा" घेतली ते इथ लिहिणं शक्य नाही. पण एक मात्र झाल, माझ्या आयुष्यातली ती बहुदा पहिली आणि शेवटची चोरी ठरली.
कदाचित तेव्हा माझी "शाळा" घेतली गेली नसती तर मी हा लेख लिहिण्याऐवजी आज एखाद्या पेपरात माझ्या अशाच एखाद्या पराक्रमाची कथा तुम्हाला वाचावी लागली असती. असो.
दोनेक वर्षांनी बादरे साहेबांची बदली झाली आणि पुन्हा माझी त्यांची कधीही भेट झाली नाही. भेटायची खूप इच्छा होती. पण एकदिवस अचानक त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजली. एकांतात धाय मोकलून रडलो .
एखादा रक्ताचा नातेवाईक गेल्यासारखी भावना आजही माझ्या मनात आहे.
@शैलेंद्र दिंडे
#मी_असा_घडलो
25/01/2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment