Sunday, May 13, 2018
वर्कप्लेस मॅनेजमेंट
वर्कप्लेस मॅनेजमेंट
घरातून कुठल्यातरी महत्वाच्या कामासाठी बाहेर पडायचं असतं. काही महत्वाची कागदपत्रं हवी असतात. अख्ख घर उलथंपालथं होऊन जातं. पण ती कधी वेळेवर सापडत नाहीत. शेवटी घरातील कोणावरतरी राग काढून आपण मोकळे होतो. एखाद्या कार्यालयात आपण काही कामासाठी जातो, पुन्हा पुन्हा जात असतो. काम मात्र होत नाही. कारण अपेक्षित फाईल तिथल्या शिपायाला कारकुनाला सापडत नाही. हा अनुभव तसा काही नवीन नाही.
असं का होतं?
प्रत्येकाच्या घरामध्ये वॉर्डरोब / कपाट असतंच. बऱ्याच ठिकाणी हे कपाट म्हणजे अलिबाबाची गुहाच जणू. शर्ट सापडला तर त्याला मॅचिंग पँट सापडत नाही. ती सापडली तर टाय सापडत नाही. हातरुमाल तर किस झाड कि पत्ती! वेळेत सापडेल तर नशीब. जी वस्तू नेमक्यावेळी सापडायला हवी ती समोर न येता नको त्या भलत्याच वस्तू पुन्हा पुन्हा समोर येत राहतात. कपाट अक्षरशः ओसंडून वाहायला लागतं. मग पुन्हा नवीन वस्तूंसाठी नवीन कपाट. हीच गोष्ट ऑफिस साठी पण लागू होते.
असं का होतं?
काही वेळा आपण व्यवस्था लावण्याचा प्रयत्न जरूर करतो. पण नव्याचे नऊ दिवसच. पुन्हा ये रे माझ्या मागल्या हे ठरलेलं.
हे टाळता येणार नाही का?
दैनंदिन गरजेच्या अशा सर्व बाबींवर थोडासा सिस्टेमॅटिक अप्रोच ठेऊन आपण समाधान शोधू शकतो आणि आपलं आयुष्य सुकर करू शकतो.
जवळपास वीसेक वर्षे एक मोठी कंपनी, तिथं होत असलेले बदल, विकसित आणि समृद्ध होत जाणारं वर्क कल्चर याचा साक्षीदार होण्याचं आणि त्यात भागीदार व्हायचं भाग्य मला लाभलं. इथल्या मेथोडिओलॉजीजचा कामात वापर करण्याबरोबरच मर्यादित अर्थाने का होईना त्या स्वतःच्या खाजगी आयुष्यातही वापरण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. तसा तो सर्वानी केला तर फायदा नक्की होईल.
वर्कप्लेस मॅनेजमेंट हा तसा खूप मोठ्ठा विषय आहे. याविषयी बरीच माहिती गुगलवर उपलब्ध आहे.(त्याचं भाषांतर करण्यात मी वेळ आणि ऊर्जा वाया घालवू इच्छित नाही.) यासाठी जी मेथोडिओलॉजी सर्रास वापरली जाते ती आहे "फाईव्ह एस" जी जापनीज लोकांची देन आहे. यामध्ये "एस" ने सुरु होणाऱ्या पाच जापनीज शब्दांचा समावेश आहे. हे पाचही शब्द सेल्फएक्सप्लेनेटरी आहेत.
१. Seiri (Sort)
हि पहिली आणि महत्वाची पायरी. यामध्ये वस्तूंचं आवश्यक, अत्यावश्यक, अनावश्यक, बाद अशा पद्धतीने वर्गीकरण करणे आणि नको असलेल्या, खराब वस्तू योग्य प्रकारे डिस्पोज ऑफ करणे अंतर्भूत आहे.
२. Seiton (Set in order / Straighten)
प्रत्येक वस्तूची घरात / ऑफिसात विशिष्ठ जागा असणे आणि ती त्याच जागेवर प्रत्येक वापरानंतर ठेवली जाणे हे वस्तू शोधण्यात घालवला जाणारा वेळ वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहे. हे करत असताना वारंवार लागणाऱ्या वस्तू जवळ, कमी उंचीवर ठेवाव्यात आणि क्वचित लागणाऱ्या वस्तू तुलनेने लांब किंवा आतमध्ये किंवा जास्त उंचीवर ठेवाव्यात. यामुळे कामात कमीतकमी अडथळे येतात. घर असेल तर प्रत्येक वस्तू, पॅक किंवा डब्याला लेबलिंग करणे आणि त्या वस्तूसाठी जागा कायमची डिमार्क करावी. घरामध्ये डिमार्केशनची तशी गरज लागत नाही. पण सवय होईपर्यंत तसं करायला हरकत नाही.
३. Seiso (Shine)
घर असेल किंवा कार्यालय .. नियमितपणे साफसफाई करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे वातावरण प्रसन्न राहून कार्यक्षमता वाढते.
४. Seiketsu (Standardize)
वरच्या तीनही स्टेप नियमित आणि काटेकोरपणे पाळल्या जाव्या म्हणून तसे नियम बनविणे, जबाबदाऱ्या निश्चित करणे आणि त्या पार पाडल्या जातात कि नाही त्याचा नियमित आढावा घेणे.
५. Shitsuke (Sustain)
नवीन अमलात आणलेली व्यवस्था नव्याचे नऊ दिवस न ठरता कायमची चालू रहावी म्हणून विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कोणतीही गोष्ट पुन्हा पुन्हा योग्य प्रकारे करत राहिलं कि ती सवय बनते आणि नकळत सुद्धा आपण ती फॉलो करत राहतो. उदा. ड्रायव्हिंग शिकताना आपण प्रचंड अलर्ट असतो. ब्रेक कुठे आहे, क्लच कुठे आहे हे पहात पहात आणि स्टिअरिंग गच्च पकडून ठेवत आपण गाडी चालवत असतो. पण पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करून एकवेळ अशी येते कि आपण बाजूच्या हिरवळीचा, निसर्गाचा आनंद घेत, गाणी गुणगुणत, जोडीदाराशी गुजगोष्टी करत ड्रायव्हिंगचा आस्वाद घ्यायला लागतो.
(विस्तारभयास्तव विषय थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक माहितीसाठी गुगलबाबाला थोडा त्रास द्या किंवा जवळच्या एखाद्या मोठ्ठ्या कारखान्याला भेट द्या. बऱ्याच ठिकाणी हि पद्धत पूर्वीपासून वापरली जाते. मुंबई परिसरातील कोणी इच्छुक असतील तर ते मलाही भेटू शकतात.)
चला तर मग ... नवीन सवयीचा ... नव्या आयुष्याचा आस्वाद घेऊया.
धन्यवाद!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment